BREAKING: खासदार राहुल शेवाळेंच्या SIT चौकशीचे आदेश, उपसभापती निलम गोऱ्हेंची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 03:28 PM2022-12-22T15:28:35+5:302022-12-22T15:29:17+5:30
शेवाळे यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य करताच आता राज्यात विधान परिषदेत ठाकरे गटाकडून शेवाळेंच्याच एसआयटी चौकशीची मागणी केली गेली
मुंबई-
राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार वाद पाहायला मिळत आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरुन गंभीर आरोप केल्यानंतर राज्याच्या विधानसभेत ठाकरे गटानं गदारोळ केला. शेवाळे यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य करताच आता राज्यात विधान परिषदेत ठाकरे गटाकडून शेवाळेंच्याच एसआयटी चौकशीची मागणी केली गेली आहे. शेवाळे यांच्या विरोधात एका महिलेनं केलेल्या गंभीर आरोपांप्रकरणी संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी आमदार मनिषा कायंदे यांनी विधानपरिषदेत केली. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कायंदे यांची मागणी मान्य करत एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत.
निलम गोऱ्हे यांनी शेवाळे यांच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर शिंदे गट आणि भाजपाकडून सभागृहात गोंधळ सुरू झाला. त्यामुळे सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात आलं आहे. "राहुल शेवाळे यांच्याविरोधात एका महिलेनं गंभीर आरोप केले आहेत. तिला पोलिसांत तक्रार करायची आहे. तिला गृहमंत्र्यांना भेटू दिलं जात नाहीय. धमकावलं जात आहे. त्यामुळे यासंपूर्ण प्रकरणात लक्ष घालून एसआयटी चौकशी केली जावी", अशी मागणी मनिषा कायंदे यांनी विधानपरिषदेत केली.
खासदार राहुल शेवाळेंना ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
राहुल शेवाळे यांचे एका महिलेसोबतचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. संबंधित महिलेनं राहुल शेवाळे यांच्यावर अत्याचाराचे गंभीर आरोप केले आहेत. पण याप्रकरणी खंडणी वसूल करण्याच्या इराद्याने खोटे आरोप केल्याचा ठपका संबंधित महिलेविरोधात ठेवण्यात आला असून मुंबईच्या साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. राहुल शेवाळे यांच्यावर आरोप करणारी महिला सध्या परदेशात आहे.
शेवाळे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला भारताबाहेर जावं लागलं आहे. ती मुंबई पोलीस आयुक्तांना भेटण्यास इच्छूक आहे. परंतु, तिला मुंबईत येऊ दिले जात नाहीये. त्यामुळे त्या पीडितेला मुंबईत येण्यासाठी संरक्षण द्यावे, या संदर्भातील पत्र आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले असल्याचं मनिषा कायंदे यांनी सांगितलं आहे.
राहुल शेवाळेंचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह रजपूत याच्या मृत्यूचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला.सुशांतसिंह रजपूर यांच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीला AU नावाने 44 कॉल आले होते. AU म्हणजे आदित्य आणि उद्धव आहेत का? असा प्रश्न लोकसभेत खासदार राहुल शेवाळे यांनी उपस्थित केला. लोकसभेत हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर महाराष्ट्राचे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.