मीरारोड - दहिसर टोलनाक्या मुळे प्रचंड प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी आणि नागरिकांचे हाल पाहता टोल नाका स्थलांतरित करा अशी मागणी खासदार यांनी परिसराची पाहणी केल्यावर केली.
आज मंगळवारी पाहणी दौऱ्यात खा . विचारे यांच्या सह आमदार गीता जैन ,महापौर ज्योत्स्ना हसनाळे , पालिका आयुक्त डॉ विजय राठोड, अतिरिक्त आयुक्त दिलीप ढोले, वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त अमित काळे , पोलीस उपायुक्त विजयकांत सागर , वाहतुकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर डोंबे, एमएमआरडीएचे मुख्य अभियंता अनिल जमादार ,अधीक्षक अभियंता विकास नाईक, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प व्यवस्थापक सुधीर सिंग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळचे कार्यकारी अभियंता एस एस जगताप, एम इ पीचे मुख्य प्रकल्प समन्वयक संतोष मयेकर, मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक अभियंता नकुल पाटील, विरोधी पक्षनेता प्रवीण पाटील, माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम, नगरसेवक राजू भोईर आदी उपस्थित होते .
मीरा भाईंदरसह मुंबई, ठाणे , वसई ,विरार व बाहेरगावच्या नागरिकांना दहिसर टोलनाक्या वर प्रचंड वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे . तासन तास नागरिक वाहन कोंडीत अडकून पडतात . ह्यात प्रचंड प्रमाणात इंधन वाया जाऊन प्रदूषण वाढते . लोकांना कामावर व घरी जायला उशीर होतो . त्यामुळे सदर टोलनाका तात्काळ स्थलांतरित करावा अशी मागणी खा. विचारे यांनी केली . वाहन कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाय योजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले .