संजय राऊत म्हणाले एकदम ओक्के, एकनाथ खडसेंनी सांगितला भेटीचा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 16:08 IST2022-10-18T16:03:51+5:302022-10-18T16:08:35+5:30
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज झाली. एकनाथ खडसे आणि संजय राऊत यांची कोर्टासमोर भेट झाली.

संजय राऊत म्हणाले एकदम ओक्के, एकनाथ खडसेंनी सांगितला भेटीचा किस्सा
मुंबई- पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज झाली. आता या प्रकरणी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. राऊत यांच्या जामीन अर्जावर आता २१ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान आज या सुनावणीवेळी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची संजय राऊत यांच्यासोबत कोर्टासमोर भेट झाली. या भेटीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या दोन नेत्यांमध्ये काहीवेळ चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या भेटीनंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्याशी झालेल्या भेटीसंदर्भात माहिती दिली.
सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, दिवाळीआधीच मिळणार महिन्याचा संपूर्ण पगार
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि खासदार संजय राऊत यांची कोर्टासमोर भेट झाली. यावेळी एकनाथ खडसे यांनी संजय राऊत यांच्या तब्येतीची चौकशी केली. "राऊत मला म्हटले लवकरच बाहेर येणार आहे. सर्व काही ओके आहे, तुम्ही सगळी चिंता करु नका, असंही एकनाथ खडसे म्हणाले.
नेमकं प्रकरण काय आहे?
ईडीने ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली. ईडीच्या म्हणण्यानुसार, म्हाडाचा भूखंड असलेली पत्राचाळ विकसित करण्याचे काम प्रवीण संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. मात्र, प्रवीण राऊत यांनी पत्राचाळीतील रहिवाशांची फसवणूक करून काही भूखंड खासगी विकासकाला विकला.
म्हाडा व भाडेकरूंच्या तोंडाला पाने पुसत प्रवीण राऊत यांनी भूखंडाचे अनेक भाग खासगी विकासकांना हस्तांतरित केले. तर स्वतःचे २५ टक्के शेअर्स एचडीआयएलला विकले. ईडीच्या म्हणण्यानुसार, या व्यवहारातील काही रक्कम संजय राऊत यांच्या पत्नीच्या बँक खात्यात जमा झाली आहे.