Sanjay Raut : 'आता मेळाव्याची लाट, लोक डुप्लिकेट मेळावे घेतात; संजय राऊतांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 12:20 PM2024-10-12T12:20:26+5:302024-10-12T12:23:05+5:30
Sanjay Raut : आज शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा दसरा मेळावा होणार आहे.
"या देशात ५० वर्षापेक्षा अधिक काळ एकच दसरा मेळावा होतो, जिथे विचारांचं सानं लुटलं जातं. तो म्हणजे शितीर्थावरील शिवसेनेचा दसरा मेळावा. माझ्या माहिती प्रमाणे देशात दोन मेळावे होतात, एक नागपूरात आरएसएसचा आणि मुंबईत शिवसेनेचा दसरा मेळावा. तो परंपरेनुसार आज होईल. आता मेळाव्याची लाट आली आहे, प्रत्येकाला विचार मांडण्याचा अधिकार आहे. बाकी आता डुप्लिकेट लोक खूप येतात मेळावे करतात, असा खोचक टोला खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.
"प्रत्येक दसऱ्याला विचारांचं सोनं बाळासाहेब ठाकरे देशाला आणि महाराष्ट्राला देत राहिले. आता तिच परंपरा उद्धव ठाकरे यांनी सुरू ठेवली आहे. तुम्ही भले पक्षाचं चिन्ह नाव चोरले असेल तरीही विचार , जनता ही मुळ शिवसेनेसोबत आहे. निवडणूक आयोग शिवसेना कोणाची हे ठरवू शकत नाही. या राज्यातील जनतेने हा निर्णय घेतला आहे. आजचा दसरा मेळावा हा विधानसभेच्या दृष्टीने ऐतिहासिक असणार आहे. आज एक दिशा महाराष्ट्राला लाभेल, असंही संजय राऊत म्हणाले.
"लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी मोठ्या विजयाची मानकरी ठरली, विधानसभाही त्याच पद्धतीने आम्ही जिंकू, असंही संजय राऊत म्हणाले. आमच्याकडे मशाल हे चिन्ह आहे, ते चिन्हही ऐतिहासिक आहे. औरंगजेबाच्या सेनेला कात्रजचा घाट दाखवला तेव्हा मशालींचा वापर केला होता, शिवरायांपासून मशालीला महत्व आहे, ती मशाल आमच्याकडे आहे, असंही राऊत म्हणाले.
"आजचे दिल्लीचे नेते महाराष्ट्राची लूट करत आहेत. ते व्यापाऱ्यांचे नेते आहेत. रावण आज सत्तेवर बसले आहे, या रावणाचे दहन आज शेवटचे असेल, असा टोलाही संजय राऊत यांनी भाजपाला लगावला.