मुंबई- राज्यात गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलंय. तर राज्यात काही ठिकाणी आंदोलकांनी जाळपोळ केली आहे. जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टीमेटम दिला असून आता सरकारही अॅक्शनमोडवर आले आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीयांची बैठक बोलवली आहे. आता या बैठकीवरुन खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.
जे करायचे ते करा, रात्रीपर्यंत ठोस निर्णय घ्या; मनोज जरांगे पाटील यांचे राज्य सरकारला अल्टिमेटम
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली. संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले की, 'या सरकारचे करायचे काय? महाराष्ट्र पेटलाय तरी यांचे निर्ल्लज्ज राजकरण सुरूच आहे. मराठा आरक्षणावर सर्व पक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली.त्या बैठकीचे निमंत्रण शिवसेनेला नाही,'असा आरोप राऊत यांनी केला आहे.
"शिवसेनेचे 16 आमदार व 6 खासदार आहेत. सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे.एक आमदार असलेल्यांना आमंत्रण.एकही आमदार नाही अशांना देखील बोलावले.पण शिवसेना यांच्या डोळ्यात खुपते.अंबादास दानवे यांना विरोधी पक्षनेते म्हणून बोलावले.ठीक.आम्हाला मानपान नको.पण प्रश्न सोडवा. जरंगे पाटील यांचे प्राण वाचवा. घटनाबाह्य सरकारची घटका भरलीच आहे. हिशोबाचे वेळ जवळ येत आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
जे करायचे ते करा, रात्रीपर्यंत ठोस निर्णय घ्या: मनोज जरांगे पाटील
आज शासनाने घेतलेला एकही निर्णय आम्हाला मान्य नाही. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण द्यावे. शासनाने काय करायचे ते करावे. बुधवारी रात्रीपर्यंत मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आज रात्रीपासून पाणी पिणे बंद करणार असून, होणाऱ्या परिणामांना शासन जबाबदार असेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांबाबत जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिल्याशिवाय माघार नाही. शासनाने शिंदे समितीचा अहवाल स्वीकारावा. विशेष अधिवेशन घेऊन आरक्षण देण्याची भूमिका जाहीर करावी.