'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार' सोहळ्यात राज ठाकरेंची मुलाखत अफलातून ठरली . राज यांची राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीस यांनी मुलाखत घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या प्रश्नावरही उत्तरं दिली. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना सल्ल्याची गरज नाही ते स्वयंभू नेते आहेत, असा टोला राज यांनी लगावला होता. या टीकेला आज खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले.
LMOTY 2023: अमितला मी राजकारणात आणू शकतो, पण...; राज ठाकरे घराणेशाहीवर स्पष्टच बोलले
संजय राऊत म्हणाले, आम्ही स्वयंभूच आहोत. जे स्वयंभू देव असतात त्यांच्या मागेच जनता जाते. जे शिंदुर फासतात त्यांच्यामागे जनता जात नाही. याच्यामुळे जर कोणाची पोटदुखी होत असेल तर सांगा आमच्यातकडे औषध आहे, असा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला.
"विरोधी पक्ष कधी सुट्टीवर जात नाही पण मुख्यमंत्री सुट्टीवर जात आहेत, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संजय राऊत यांनी लगावला. मी आज जम्मूचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेणार आहे, असंही राऊत म्हणाले.
"आम्हाला मतदान करा नाहीतर दंगली होती अशा प्रकारच्या धमक्या देणे देशाच्या गृहमंत्र्यांना सोबत नाही, असा आरोप संजय राऊत यांनी अमित शहा यांच्यावर केला. तुमच राजकारण दंगली, हत्या, बॉम्बस्फोटाच आहे त्यामुळे देशातील जनतेला डोळसपण पाऊले टाकावी लागणार आहेत, असंही राऊत म्हणाले.
"अमितला मी राजकारणात आणू शकतो"
अमोल कोल्हे यांनी राजकारणातील घराणेशाही संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, तुम्ही तुमच्या घरातील व्यक्तीला राजकारणात आणू शकता. लादू शकत नाही. एका पातळीपर्यंत त्याला पुढे आणू शकता. हे माझं मत मी सांगतो. उद्या तुम्ही अमित ठाकरेंबाबत बोलाल, तर मी अमितला आणू शकतो. एक बाप म्हणून माझं कर्तव्य आहे. मी त्याला आणला तरी मी लोकांवर त्याला लादू शकत नाही. लोकांनी स्वीकारायचं असतं, असं मत राज ठाकरे यांनी मांडलं.
महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात राज ठाकरे यांची मुलाखत घेताना खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी राज ठाकरेंना सर्वसामान्य युवकांनी राजकारणात यावं का? आपण युवा नेता म्हणतो तेव्हा राजकीय घराण्याची पार्श्वभूमी असलेली व्यक्तीच राजकारणात येते आणि नेता होते. असा एकतरी नेता तुमच्या पाहण्यात आहे का, ज्याच्या नातेवाईकांवर कार्यकर्त्यांपेक्षा अधिक केसेस आहेत, असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, माझ्यावर एवढ्या केस आहेत. महाराष्ट्रात जेवढ्या कुणाच्या नसतील तेवढ्या केसेस माझ्या अंगावर आहेत. मी अस्वल म्हणून फिरू शकतो एवढे केस माझ्यावर आहेत, असं मिश्किल उत्तर त्यांनी दिलं.