मुंबई- ताबडतोब बेळगावसह सीमाभाग केंद्रशासीत प्रदेश करा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय बेळगावात मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही, असा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी केला. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
संजय राऊतांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह राज्य सरकारवर देखील निशाणा साधला. कर्नाटकचा मुख्यमंत्री राज्यात स्वतः घुसून दादागिरी करतो आणि तुम्ही गप्प आहात. स्वतःला भाई बोलता ना, मग दाखवा भाईगिरी, असं संजय राऊत म्हणाले. दोन मंत्र्यांनी काल शेपूट घातली. डरपोक सरकार आहे, हे सरकार नामर्दासारखं बसलेलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेची काळजी नाही, अशी टीकाही संजय राऊतांनी यावेळी केली. तसेच काहीतरी भूमिका घ्या, तोंडाला कुलूप लावलंय का?, असा सवाल करत हे ढाल तलवारीच्या लायकीचे नाहीत. यांना कुलूप चिन्ह दिलं पाहिजे, अशी मागणीही संजय राऊतांनी केली.
गेल्या २४ तासापासून सीमाभागामध्ये महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड होत आहे. प्रतिकार करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक केली जात आहे. मग महाराष्ट्र सरकार आहे की नाही? असा सवाल राऊतांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवस हे केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटायला दिल्लीत जात आहे. त्यांना भेटून काय उपयोग, त्यांना कळत नाही का? महाराष्ट्रात काय चाललयं?, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी मंगळवारी राज्याच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्यात फोनवर चर्चा झाल्याचे सांगितले. जो प्रकार घडला त्यावर एकनाथ शिंदेंनी खेद व्यक्त केला आहे. यावर बोम्मई यांनी सकाळी जो प्रकार झाला त्या लोकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. काही लोकांवर आधीच केली आहे, असे सांगितल्याचे सामंत म्हणाले.
नेमकं काय घडलं?
महाराष्ट्राचे सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई यांनी मंगळवारचा आपला दौरा रद्द केलेला असताना दुसरीकडे याच मंत्र्यांचा निषेध करण्यासाठी कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते बेळगाव येथे दाखल झाल्यामुळे तिथे प्रचंड पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सीमाभागातील टोलनाक्यांवर अडवणूक आणि तपासणी अशा साऱ्या वातावरणात एकंदरच बेळगावचे वातावरण तापलेले आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील मराठी माणूसही पेटून उठल्याचे दिसून येते, पुण्यात काही कन्नड बसेसना काळं फासण्यात आलं होतं. दुसरीकडे महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष आक्रमक झाले आहेत. शिवसेनेनं शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार प्रहार केलाय. मनसेनंही यावर भूमिका घेत सरकारने या हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी केलीय.