मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला आहे. रायगडावर त्यांचे बालपण गेलं आहे. स्वराज्याची शपथ महाराजांनी रायगडावर घेतल्याचं विधान भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी केलं आहे. प्रसाद लाड यांच्या या विधानावरुन राज्यात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे. तसेच विरोधकही आक्रमक झाले आहे.
ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी देखील प्रसाद लाड यांच्यावर निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलण्याची यांची लायकी नसल्याचं संजय राऊत म्हणाले. तसेच भाजपाने इतिहास संशोधन मंडळाची नव्यानं स्थापना केलीय का?, असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
छत्रपती उदयनराजे भोसले असतील किंवा छत्रपती संभाजीराजे असतील, ते आपापल्या पद्धतीनं जागरुकता निर्माण करत आहेत. विरोधी पक्षसुद्धा लवकरच त्यासंदर्भात आपली भूमिका जाहीर करेल. उद्या किंवा परवा याबाबत आम्ही बोलू असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
दरम्यान, छत्रपती शिवराय हे संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत आहेत. महाराजांची कर्मभूमी कोकण होती, स्वराज्याची मुहूर्तमेढ कोकणात रोवली गेली हे देखील विसरून चालणार नाही. अनावधानाने माझ्याकडून दुसरा शब्द प्रयोग झाला. परंतू, त्वरित चूक दुरुस्त केल्याचे प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. विश्वाचे आराध्य दैवत शिवरायांचा सन्मान आम्ही यापुढेही ठेवणार. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असे प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.