मुंबई- स्वित्झर्लंड येथील दावोस येथे सुरू झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत दोन दिवसांत महाराष्ट्रात सुमारे ८८ हजार ४२० कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आले. या परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे दावोसमध्ये दाखल झाले होते. तसेच दावोस येथे असलेल्या महाराष्ट्र पॅव्हेलियनचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मात्र या दौऱ्यावरुन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.
दाओसला काय चालतं, हे आम्हाला माहिती आहे. दाओसच्या गुंतवणुकीतील विटा इथे रचल्या जातील, तेव्हा पाहू, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. अशा प्रकारचे रोजगार मेळावे हे जगभरात होत असतात. तो जागतिक मेळावा एक असतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाओसमध्ये काय केलं?, कोणाला भेटले?, याचा हिशोब नंतर होईल, असं सूचक विधानही संजय राऊतांनी केलं आहे. बाळासाहेबांच्या तैलचित्रावरही संजय राऊतांनी भाष्य केलंय. शिवसेना प्रमुखांचं तैलचित्र लावत आहे, पण त्यांच्या चिरंजीव यांना आमंत्रण नाही. यापूर्वी आम्ही सावरकरांचे तैल चित्र लावले आहेत. तेव्हा आम्ही मात्र त्यांच्या कुटुंबियांना बोलावलं होतं, अशी माहिती संजय राऊतांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (१९ जानेवारी) रोजी मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी विविध कामांची उद्घाटनं त्यांच्या हस्ते होणार आहे. यावर देखील संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी उद्घाटन करत असलेल्या कामांची पायाभरणी शिवसेनेची असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं. नरेंद्र मोदी आमच्याच कामावर शिक्कामोर्तब करत आहेत. राज्यात कोणत्याही परंपरा पाळल्या जात नाहीत. राज्यात सूड आणि बदला घेण्याचं राजकारण सुरु असल्याची टीका संजय राऊतांनी केली. त्यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला.
दरम्यान, नरेंद्र मोदी १९ तारखेला मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा दौरा हा मुंबईकरांसाठी खास असणार आहे. कारण या दौऱ्यात मुंबईच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आणि तितक्याच गरजेच्या विकास कामांचा शुभारंभ आणि प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. हे प्रकल्प मुंबईचा कायापालट करणारे तर आहेतच, शिवाय मुंबईला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारे आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"