मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखविण्याबरोबरच विविध कार्यक्रमांना नरेंद्र मोदी उपस्थिती लावणार आहेत. नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून मरोळमध्ये मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.
मुंबईच्या अंधेरी पूर्वेत मरोळ परिसरामध्ये बोरी मुस्लिम समाजाकडून उभारण्यात आलेली अल जामिया युनिव्हर्सिटीचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मरोळमध्ये मोठ्या संख्यामध्ये बोरी मुस्लिम समाज राहतो. बोरी मुस्लिम समाजाकडून मुंबईमध्ये पहिल्यांदा अल जामिया युनिव्हर्सिटी उभारण्यात आली आहे. याच युनिव्हर्सिटीचे उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी साडेचार वाजता मरोळमध्ये येणार आहेत. मात्र नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यावर ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
पालिका निवडणूक तारीख ठरत नाही, तोपर्यंत नरेंद्र मोदी यांचा मुक्काम मुंबईत राहील यात शंका नाही. मोदी कार्ड जरी वापरलं तरी मुंबईत शिवसेनाच येणार, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच संसदेत अनेक महत्वाच्या घडामोडी घडत असताना नरेंद्र मोदी मुंबईत येताय. त्यांना मुंबई महापालिका जिंकायची आहे. नरेंद्र मोदींनी यावं, मुंबईत घर घ्यावं, राजभवनामध्ये राहावं, मात्र पालिका काही मिळणार नाही, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
दरम्यान, नरेंद्र मोदी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून दोन वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवतील. त्यानंतर त्या दोन्ही गाड्या रवाना होतील. सध्या उपलब्ध असलेल्या रेल्वे लाईनवरच वेगवान आणि आरामदायक प्रवास यासाठी या ट्रेन बनवण्यात आल्यात. संपूर्णपणे भारतीय बनावटीची ही पहिली सेमीस्पीड ट्रेन आहे. पूर्णपणे एसी, वायफाय, अद्ययावत सस्पेंशन, पूश बैक सीट्स अशी या रेल्वेची खासियत असणार आहे.
नरेंद्र मोदी यांच्या मरोळमध्ये आगमनाआधी मुंबई महानगरपालिकाकडून आणि मुंबई पोलिसांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मरोळ परिसर हा मोठा झोपडपट्टीच्या परिसर असल्यामुळे पोलिसांसमोर मोदींच्या दौरासाठी मोठा आव्हान असणार आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या १००० जवान नरेंद्र मोदी यांच्या मरोळ मध्ये दौरासाठी तैनात करण्यात आला आहे.
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यामुळे पूर्व द्रुतगती मार्ग, पी.डीमेलो रोड, शहीद भगतसिंग रोड तसेच कार्यक्रमस्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर्व द्रुतगती मार्ग, पी.डीमेलो रोड, शहीद भगतसिंग रोड (सर्व बाजू रस्तेसह) शुक्रवारी दुपारी १४.४५ वा. ते १६.१५ वा. पर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.