Join us

'PM मोदी काळाराम मंदिरात दर्शनासाठी आल्याचे आनंद, पण...'; संजय राऊतांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 2:53 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात जाऊन भगवान श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते काळाराम मंदिरात विधीवत पूजा व आरती करण्यात आली. यावेळी काळाराम मंदिर संस्थानचे मुख्य महंत व विश्वस्त यांच्यातर्फे पंतप्रधान मोदी यांचा भगवान श्रीरामाची चांदीची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

PM मोदींच्या खांद्यावरची शाल खाली पडणार, इतक्यात CM शिंदेंनी...; पाहा पुढे काय घडलं!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी नाशिक येथे आयोजित केलेल्या २७व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन केले. नरेंद्र मोदींचे नाशकात जोरदार स्वागत करण्यात आले. नाशिकमध्ये येताच सर्वप्रथम नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिराला भेट दिली. मात्र यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकला काळाराम मंदिरात दर्शनासाठी आले, आनंद आहे. पण दर्शन झाल्यानंतर थोडा वेळ काढून जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही त्यांनी भेटायला पाहिजे होतं, असं संजय राऊत ट्विट करत म्हणाले. 

नाशिक जिल्हा हा देशातील सर्वात मोठं कांदा उत्पादक जिल्हा आहे, पण कांदा निर्यात बंदीमुळे इथला शेतकरी पार कोलमडून पडलाय. पंतप्रधान या शेतकऱ्यांना का भेटले नाहीत?, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. राजकारण करायला वेळ आहे, पण देशाला पोसणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू दिसत नाहीत. भाजपला केवळ धर्माच्या नावावर राजकारणाची भाकरी भाजण्याचं काम येतं. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले, असा निशाणा देखील संजय राऊतांनी साधला आहे.

नरेंद्र मोदींनी काळाराम मंदिरात श्रीरामाचे दर्शन घेतले, व्हिडीओ-

टॅग्स :नरेंद्र मोदीसंजय राऊतनाशिकभाजपाशेतकरीमहाराष्ट्र