मुंबई: राज्यातील एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारला ३० जून रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या काळात सरकारने अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले; पण मंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्ये, मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार, त्यातून आलेली नाराजी, महाराष्ट्रभूषण समारंभातील दुर्घटना अशा काही बाबींची किनारही या कामगिरीला आहे.
महाविकास आघाडी सरकारमधून शिंदे समर्थक आमदारांसह बाहेर पडले आणि शिंदे-फडणवीस जोडीने चमत्कार करत युतीचे सरकार आणले. ९ ऑगस्टला १८ मंत्र्यांचा समावेश करीत मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. तेव्हापासून दुसऱ्या विस्ताराची प्रतीक्षा आहे. शिंदेंसोबत असलेले बच्चू कडू, आशिष जयस्वाल यांनी याबाबत वेळोवेळी नाराजीही दाखविली आहे. सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणाची टांगती तलवार असल्याने सरकारबाबतची अनिश्चितता बरेच महिने होती; पण अखेर सरकारला सर्वोच्च दिलासा मिळाल्याने सरकारची गतिमानता वाढल्याचे दिसत आहे.
शरद पवारांना समजून घेण्यासाठी भाजपाला शंभर जन्म घ्यावे लागतील; संजय राऊतांचं विधान
शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन एक वर्ष झाल्यानं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. महाराष्ट्राच्या फसवणुकीला एक वर्ष पुर्ण झाले. शिवसेनेच्या पाठीवर खंजीर खुपसण्याला एक वर्ष झाली. उचापती करून घटनाबाह्य सरकार स्थापन झालेल्या सरकारला एक वर्ष झाली. आम्ही या सरकारकडे सरकार म्हणून पाहतच नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली. ही फसवणुकीची जयंती असून पुढल्या वेळेला फसवणुकीची पुण्यतिथी असेल, असा निशाणा संजय राऊतांनी साधला.
राज्य अनेक संघर्षातून जात आहे, कायदा व व्यवस्थेपासून बेरोजगारी पर्यंत अनेक प्रश्न आहेत. पुण्यासारख्या जिल्ह्यातून अनेक मुली गायब झाल्या त्यांची हत्या करण्यात आली. याला सकसपणाची लक्षणे म्हणत नाहीत. पालिकेची निवडणूक तुम्ही दोन वर्ष घेऊ शकला नाहीत. राज्याचे गृहमंत्री इतर सर्व विषयांवर वायफळ चर्चा करतात. पण गृहमंत्री म्हणून त्यांचा कारभार हा अत्यंत अयशस्वी आहे, असं संजय राऊत म्हणाले. तसेच दिल्लीत ते सेलिब्रेशन करायला बसले असतील. या मंत्रिमंडळाचा विस्तार जर झाला, तर शिंदे गटाचे चार मंत्री नक्कीच घरी जातील, असा दावाही संजय राऊतांनी केला आहे.
दरम्यान, सामान्य शिवसैनिक ते मुख्यमंत्री असा अद्भूत प्रवास केलेले शिंदे यांनी, ‘आमचे सरकार हे देणारे सरकार आहे’ असे सुरुवातीपासूनच सांगितले आणि लोकाभिमुख निर्णयांद्वारे त्याची प्रचितीही दिली. फडणवीस यांच्या अनुभवाचा त्यासाठी फायदा झाला. शिंदे- फडणवीस यांच्यात जबरदस्त समन्वय सुरुवातीपासूनच दिसत होता; पण काही दिवसांपूर्वी ‘देशात नरेंद्र मोदी, राज्यात एकनाथ शिंदे’ अशी जाहिरात शिवसेनेकडून दिली गेली आणि मिठाचा खडा पडला. त्यावरून सारवासारवही झाली. आता दोघांनीही त्यावर पडदा टाकला आहे. भाजप- शिवसेनेमध्ये समन्वय समिती अजूनही बनलेली नाही, महामंडळांवरील नियुक्त्याही रखडल्या आहेत. यातच विरोधकांच्या टीकेला उत्तरे देण्यातही सरकारचा बराच वेळ गेला आहे.