Join us  

Sanjay Raut: दिल्लीतील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याचाही फोन आला; स्वत: संजय राऊतांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 1:14 PM

MP Sanjay Raut: संजय राऊत आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्री निवासस्थानी दाखल झाले आहेत.

मुंबई- शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची पत्राचाळ घोटाळाप्रकरणी जामिनावर सुटका झाल्यानंतर आज ते १०३ दिवसांनंतर प्रसार माध्यमांसमोर आले. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. तुरुंगात राहणं काही सोपं नसतं. जेलमध्ये लोक मजेत राहत असं वाटत असेल तर तसं नाहीय. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी हे दिवस खूप खडतर गेले, असं संजय राऊतांनी सांगितलं.

संजय राऊत आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्री निवासस्थानी दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची देखील संजय राऊत भेट घेणार आहेत. मला आज अनेकजणांनी फोन करुन विचारपूस केली. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील मला फोन करुन विचारपूस केल्याची माहिती संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना दिली.

पहिल्याच पत्रकार परिषदेतून संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा; टोला लगावत म्हणाले...

 राज्यात नवं सरकार आल्यानंतर फडणवीसांनी काही निर्णय नक्कीच चांगले घेतले आहेत. विरोधाला विरोध आम्ही करणार नाही. राज्याचा कारभार उपमुख्यमंत्रीच चालवात आहेत. महत्वाचे निर्णय तेच घेत आहेत. म्हाडाचे अधिकार आम्ही काढले होते ते फडणवीसांनी पुन्हा बहाल केले असे काही निर्णय कौतुकास्पद आहेत. त्यामुळे कामानिमित्त पुढच्या काही दिवसात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. तसंच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेणार आहे", असं संजय राऊत म्हणाले.    

दरम्यान,  माझ्या मनात कुणाबद्दलही तक्रार नाही. जे मला भोगावं लागलं, ते मी भोगलं, कुटुंबाने, माझ्या पक्षाने भोगलं, खूप गमावलं. राजकारणात हे होत राहतं. मात्र अशाप्रकारचं राजकारण देशाच्या इतिहासात कधी घडलं नाही. देश जेव्हा पारतंत्र्यात होता तेव्हाही असं घडलं नव्हतं. शत्रूबाबतही घडलं नसेल. मी याबाबत कोणाला दोष देणार नाही, सिस्टिमला दोष देणार नाही. चांगलं काम करण्याची संधी सर्वांना मिळते, त्यांनी करावं, असं संजय राऊत म्हणाले. 

राज ठाकरेंना लगावला टोला-

संजय राऊत यांनी यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या विधानाचीही आठवण करुन देत त्यांना प्रत्युत्तर दिलं. "राज ठाकरेंनी मला तुरुंगात जावं लागेल असं म्हटलं होतं आणि एकांतात स्वत:शीच बोलायची प्रॅक्टीस करा असाही सल्ला दिला होता. आज मी सांगतो होय मी एकांतात संवाद साधला. कारण सावरकरही एकांतात होते. लोकमान्य टिळकही एकांतात होते. स्वातंत्र्यासाठी त्यांनी तुरुंगवास भोगला. माझीही अटक राजकीय होती हे आता कोर्टाच्या निर्णयानंतर स्पष्ट झालं आहे", असं संजय राऊत म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"     

टॅग्स :संजय राऊतशिवसेनासुब्रहमण्यम स्वामीभाजपा