Join us

अमित ठाकरेंना माहीममधून उमेदवारी; संजय राऊतांनी एका वाक्यात दिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 10:26 AM

मनसेकडून विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून अमित ठाकरे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.

Sanjay Raut on Amit Thackeray :  विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता मनसेने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत दुसरेच नाव आहे अमित राज ठाकरे यांचे आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे हे निवडणूक लढवणार आहे. अमित ठाकरे यांना उमेदवारी घोषित होताच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे घराण्यातील दुसरे पुत्र अमित ठाकरे हे विधानसभा निवडणुकीत उतरल्यानंतर संजय राऊत यांनी ही लोकशाही आहे असं म्हटलं आहे.

अमित ठाकरे हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत. माहीम मतदारसंघातून अमित ठाकरे हे निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर यांचे आव्हान असणार आहे. तर ठाकरे गटाने अद्याप या जागेवर उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. अमित ठाकरेंसमोर विधानसभेच्या निवडणुकीत आतापर्यंत कधीही पराभव न झालेले सदा सरवणकर यांचे कडवे आव्हान असणार आहे.

मनसेकडून अमित ठाकरे यांना माहीममधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांनी राऊत यांना राजकारणात आणखी एक ठाकरे मैदानात उतरले आहेत, असा सवाल विचारला होता. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी, "लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या असतात," अशी प्रतिक्रिया दिली. 

दुसरीकडे, वरळी विधानसभेतून आदित्य ठाकरेंविरोधात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वरळी विधासभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडून आले होते. त्यावेळी राज ठाकरेंनी मनसेचा उमेदवार दिला नव्हता. मात्र यावेळी मनसेने आदित्य ठाकरेंच्या विरोधात संदीप देशपांडेंना तिकिट दिलं आहे.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४मुंबई विधानसभा निवडणूकअमित ठाकरेराज ठाकरेसंजय राऊतमाहीम