मुंबई: राज्यात एकीकडे सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले असताना दुसरीकडे देशात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची (Presidential election 2022) रणधुमाळी सुरू आहे. अनेक उमेदवारांच्या नावाचे प्रस्ताव दिल्यानंतर अखेरिस विरोधकांनी यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून निश्चित केले आहे. तर भाजपकडून द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेकडूनही द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा मिळावा, यासाठी खासदारांनी उद्धव ठाकरेंना आग्रह केला आहे. खासदारांच्या झालेल्या बैठकीनंतर आता शिवसेना एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ शकते, हे जवळपास निश्चित झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी द्रौपदी मुर्मू यांना देण्यात येणाऱ्या पाठिंब्याविषयी भाष्य केले. एकनाथ शिंदे यांच्या गटाला एनडीएने राष्ट्रपती निवडणुकीच्या संदर्भातील बैठकीसाठी निमंत्रण मिळाले आहे. दीपक केसरकर दिल्लीला जाणार असल्याचे सांगितले आहे. यावर संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, आम्ही या सर्व गोष्टींकडे तटस्थपणे पाहतो, असे संजय राऊत म्हणाले.
राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील
राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील. उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो सर्वांना बंधनकारक आहे, असे संजय राऊत म्हणाले. खासदारांच्या बैठकीला एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि भावना गवळी उपस्थित नव्हते. द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला म्हणजे भाजपला पाठिंबा दिला असे होत नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, राष्ट्रपती निवडणुकीच्या संदर्भात देशातील वेगवेगळे मतप्रवाह आहेत. द्रौपदी मुर्मू या पहिल्या आदिवासी उमेदवार आहेत. आमश्या पाडवी यांच्यासह शिवसेनेतील इतर नेते उपस्थित होते. यशवंत सिन्हा हे विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत. विरोधी पक्ष टिकायला पाहिजे, ही भूमिका असली तरी लोकभावना काय आहे, हे पाहणे महत्त्वाचे आहे. यापूर्वी आम्ही प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता. यशवंत सिन्हा यांना आमच्या सद्भावना आहेत, असे संजय राऊत म्हणाले. दुसरीकडे, यासंदर्भात शिवसेनेत दोन गट पडले असून, संजय राऊत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याच्या गटात नसल्याचे सांगितले जात आहे.