Sanjay Raut On Nawab Malik : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्याने या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. १२ अर्ज दाखल झाल्याने कोणता उमेदवार पराभूत होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. एका उमेदवारामुळे या निवडणुकीची समीकरणे बदलल्याने निडणुकीची सारी समीकरणे बदलली आहेत. दुसरीकडे, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची आणि आमदारांची बैठक मंगळवारी पार पडली. महत्त्वाचे म्हणजे या बैठकीत राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक हेदेखील हजर होते. भाजपने मलिकांना जाहीरपणे विरोध केलेला असतानाही त्यांनी अजित पवार यांच्या बैठकीला हजेरी लावली होती. त्यावरुन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
अजित पवारांचे शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर झालेल्या या बैठकीला नवाब मलिक उपस्थित होते. मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणातून तुरुंगाबाहेर आल्यानंतर नवाब मलिकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता. त्यानंतर नवाब मलिक यांना महायुतीत घेण्याला भाजपने उघडपणे विरोध केला.देवेंद्र फडणवीस यांनीही अजित पवार यांना पत्र लिहून आपली नाराजी दर्शवली होती. त्यानंतर मलिक हे राष्ट्रवादीच्या बैठकांपासून लांब होते. मात्र आता पुन्हा मलिक हे राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थित राहिल्याने नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. यावरुनच संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना मलिकांच्या मतांची गरज असल्याचे म्हटलं आहे.
"नवाब मलिक हे आमदार आहेत. आता देवेंद्र फडणवीसांनी विरोध केला की नाही हे माहिती नाही. आता त्यांना एका मताची गरज आहे. नवाब मलिक यांच्याबाबतीत देवेंद्र फडणवीस यांचा व्यक्तिगत राग आहे. नवाब मलिक यांना खोट्या गुन्ह्यात कसे अडवण्यात आले हे सगळं रेकॉर्डवर आहे. नवाब मलिक यांच्यापेक्षा गंभीर गु्न्हे केलेले लोक शिंदे गट आणि भाजपमध्ये आहेत. त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस बोलणार आहेत का? महाराष्ट्राचे राजकारण देवेंद्र फडणवीस यांनी खराब केलं आहे. या राज्याची संस्कृती, सभ्यतेला काळिमा फासला. या राज्याची सुत्रे देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आल्यानंतर महाराष्ट्राचे नुकसान झालं आहे. लोकसभेल पंतप्रधान मोदींच्या विरोधात लढाई होती. आता विधानसभेला महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हटाव असेल आणि जनता त्यांना पराभूत करेल," असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, अजित पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत आमदारांसोबत विधानपरिषद निवडणुकीबाबत चर्चा केल्याची माहिती आहे. त्यामुळे नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा सक्रिय झाल्याने भाजप काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.