“काळोखात नारळ-शेण फेकले, समोर आले नाहीत, अन्यथा शिवसैनिक काय ते दाखवले असते”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 12:33 PM2024-08-11T12:33:14+5:302024-08-11T12:34:37+5:30

Sanjay Raut News: ठाण्यातील घटनेबाबत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना माहिती होते. दोन महिने थांबा, क्रियेला प्रतिक्रिया काय असते, ते कळेल, सत्तेची मस्ती दाखवू नका, अशी टीका संजय राऊतांनी केली.

mp sanjay raut warns and reaction over clashes between thackeray group and mns | “काळोखात नारळ-शेण फेकले, समोर आले नाहीत, अन्यथा शिवसैनिक काय ते दाखवले असते”: संजय राऊत

“काळोखात नारळ-शेण फेकले, समोर आले नाहीत, अन्यथा शिवसैनिक काय ते दाखवले असते”: संजय राऊत

Sanjay Raut News: ठाण्यामध्ये भगवा सप्ताहाचा समारोप होता आणि गडकरी रंगायतन येथे शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत भगवा सप्ताह जल्लोषात पार पडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ठाण्यात येताना जागोजागी स्वागत झाले, ठाण्यात स्वागत झाले. सभागृह भरगच्च भरलेले होते. परंतु, दिल्लीतील अहमदशाह अब्दाली याच्या सुपाऱ्या घेतलेल्या लोकांनी काळोखात लपून नारळ आणि शेण फेकले. नशीब त्यांचे ते आमच्यासमोर आले नाहीत, अन्यथा शिवसैनिक आणि महाराष्ट्र काय आहे, ते दाखवून दिले असते, या शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला.

मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मनसे प्रमुखांच्या ताफ्यावर काही फेकले, ते आम्ही वृत्तपत्रात वाचले. पुन्हा सांगतो की, शिवसेना पक्ष म्हणून आमचा त्याच्याशी संबंध नाही. स्थानिक पातळीवर मराठा आंदोलक एकत्र आले आणि त्यांनी निषेध व्यक्त केला. परंतु, ठाण्यात जे झाले. क्रियेला प्रतिक्रिया देण्याच्या नावाखाली जो प्रकार झाला. मर्दाची अवलाद असाल, तर समोरून हल्ला केला असता. परंतु, शिवसैनिकांकडून तुम्हाला विनंती आहे की, पुन्हा काळोखात लपूनछपून असे हल्ले करु नका. तुमच्या घरातही आईवडील, मुलबाळे, तुमची पत्नी हे सगळे वाट पाहत असतात, असे सांगत संजय राऊतांनी थेट इशारा दिला. 

दिल्लीतील अहमदशाह अब्दालीने काही नेत्यांना सुपाऱ्या दिल्यात

दिल्लीतील अहमदशाह अब्दाली याने विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात गोंधळ निर्माण करण्यासाठी काही नेत्यांना सुपाऱ्या दिल्या आहेत. महाराष्ट्रातील दोन ते तीन प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. या नेत्यांना अहमदशहा अब्दालीने कोट्यवधी रुपयांची सुपारी दिली आहे. त्यापैकीच एक सुपारी ठाण्यात वाजवली गेली, असा दावा संजय राऊतांनी केला. या हल्ल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती होती. दोन महिने थांबा, तुम्हाला अॅक्शन-रिअॅक्शन काय असते, ते दाखवू. सत्तेची एवढी मस्ती दाखवू नका. मराठी माणूस एकमेकांविरुद्ध लढतो आणि अहमदशहा अब्दाली तिकडे टाळ्या वाजवत आहे. आम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक आहोत हे त्यांनाही माहिती आहे, असे संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, शरद पवार हे देशातले एक जेष्ठ नेते आहेत. अनुभवी नेते आहेत. कृषी सामाजिक क्षेत्रातले सर्वात मोठे जाणकार आणि मार्गदर्शक आहेत तुम्ही त्यांच्याविषयी तुमच्या मनात जे भावना असतील, एकेकाळी तुम्ही त्यांचे उंबरठे झिजवत होतात ते विसरलात, त्यांच्या उंबरठ्यावर जाऊन बसत होता हे महाराष्ट्राने पाहिला आहे, फार बोलायला लावू नका, असा इशारा संजय राऊतांनी दिला. तसेच अशा घटनांनी आम्हाला फरक पडत नाही. आमचा ठाण्यातील कार्यक्रम उत्तम झाला. आमची विधानसभा निवडणुकीची तयारी उत्तम प्रकारे सुरु आहे, असे संजय राऊतांनी सांगितले.

 

Web Title: mp sanjay raut warns and reaction over clashes between thackeray group and mns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.