Join us

खासदार संजय राऊत यांचा कोठडीतील मुक्काम वाढला; आजच्या सुनावणीत नेमकं काय झालं ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 5:22 PM

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज झाली. आता या प्रकरणी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

मुंबई- पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज झाली. आता या प्रकरणी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. राऊत यांच्या जामीन अर्जावर आता २१ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता राऊत यांच्या जामीन पुन्हा लांबला आहे.

संजय राऊत यांनी जामिनासाठी पीएमएलए कोर्टात अर्ज केला आहे. त्यांच्या जामीन अर्जावर काल सोमवारी सुनावणी होणार होती. मात्र, काही कारणामुळे कालची सुनावणी तहकूब करण्यात आली. त्यामुळे राऊत यांच्या जामिनावर आज सुनावणी झाली. याआधी १० ऑक्टोबरला संजय राऊतांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली तेव्हा त्यांच्या कोठडीत सात दिवसांची वाढ करण्यात आली होती.

संजय राऊत म्हणाले एकदम ओक्के, एकनाथ खडसेंनी सांगितला भेटीचा किस्सा

नेमकं प्रकरण काय आहे? 

ईडीने ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक  केली. ईडीच्या म्हणण्यानुसार, म्हाडाचा भूखंड असलेली पत्राचाळ विकसित करण्याचे काम प्रवीण संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. मात्र, प्रवीण राऊत यांनी पत्राचाळीतील रहिवाशांची फसवणूक करून काही भूखंड खासगी विकासकाला विकला. 

म्हाडा व भाडेकरूंच्या तोंडाला पाने पुसत प्रवीण राऊत यांनी  भूखंडाचे अनेक भाग खासगी विकासकांना हस्तांतरित केले. तर स्वतःचे २५ टक्के शेअर्स एचडीआयएलला विकले. ईडीच्या म्हणण्यानुसार, या व्यवहारातील काही रक्कम संजय राऊत यांच्या पत्नीच्या बँक खात्यात जमा झाली आहे.

 एकनाथ खडसेंनी सांगितला भेटीचा किस्सा

दरम्यान, आज या सुनावणीवेळी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची संजय राऊत यांच्यासोबत कोर्टासमोर भेट झाली. या भेटीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि खासदार संजय राऊत यांची कोर्टासमोर भेट झाली. यावेळी एकनाथ खडसे यांनी संजय राऊत यांच्या तब्येतीची चौकशी केली. "राऊत मला म्हटले लवकरच बाहेर येणार आहे. सर्व काही ओके आहे, तुम्ही सगळी चिंता करु नका, असंही एकनाथ खडसे म्हणाले. 

टॅग्स :संजय राऊतशिवसेना