Join us  

“जनतेत संताप, महाराजांचा पुतळा कोसळण्याला जबाबदार असणाऱ्यांना माफी नाही”: शाहू महाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2024 4:00 PM

MP Shahu Maharaj Maha Vikas Aghadi News: छत्रपती शिवाजी महाराजांचा मान राखला पाहिजे. गेट वे ऑफ इंडियाच्या साक्षीने शिवद्रोह्यांना गेट आऊट ऑफ इंडिया केल्याशिवाय गप्प बसू नका, असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले.

MP Shahu Maharaj Maha Vikas Aghadi News: मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळून महाराजांचा अपमान केल्याप्रकरणी महाविकास आघाडीने हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंत मोर्चा काढत सरकारला जोडे मारो आंदोलन केले. हुतात्म्यांना अभिवादन करून हा मार्चा गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत पोहचला. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकारवर आगपाखड करत जोरदार निषेध नोंदवला.

मालवणच्या राजकोट किल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे पडला असे विधान मुख्यमंत्र्यांनी केले. गेट वे ऑफ इंडियासमोरचा पुतळा अनेक वर्षापासून आहे, राज्यातही अनेक भागात असे पुतळे आजही भक्कमपणे उभे आहेत. राजकोटच्या किल्यावरील पुतळा कोसळण्याची घटना हा भ्रष्टाचाराचा नमुना आहे. महाराजांचा पुतळा कोसळल्याने देशातील शिवप्रेमींचा अपमान झाला आहे, ज्यांच्यामुळे हा पुतळा पडला त्यांचा निषेध करण्यासाठी आंदोलन होते, अशी प्रतिक्रिया खासदार शरद पवार यांनी दिली. 

महाराजांचा पुतळा कोसळण्याला जबाबदार असणाऱ्यांना माफी नाही

तसेच खासदार शाहू महाराज यांनीही या मोर्चात सहभागी होत सरकारवर टीकास्त्र सोडले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने जनता संतप्त झाली आहे. हा महाराजांचा व महाराष्ट्राचा अपमान आहे, ज्यांनी हे केले त्यांना माफी नाही. जे लोक याप्रकरणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. शिवाजी महाराजांचा मान राखला पाहिजे, त्याप्रमाणे आपली पावले पडली पाहिजेत, असे शाहू महाराज म्हणाले.

दरम्यान, छत्रपतींता पुतळा कोसळल्याने देशभरातील शिवप्रेमींच्या भावना संतप्त असल्याने पंतप्रधानांनी माफी मागितली पण ही माफी मागतानाही त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती, अशी माफी मान्य नाही. पुतळा पडला म्हणून माफी मागितली, की भ्रष्टाचार झाला म्हणून माफी मागितली, की भ्रष्टाचाराला पांघरून घालण्यासाठी त्यांनी माफी मागितली. महाराजांचा अपमान करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. देशाचे प्रवेशद्वार गेट वे ऑफ इंडियाच्या साक्षीने या शिवद्रोह्यांना गेट आऊट ऑफ इंडिया केल्याशिवाय गप्प बसू नका, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले.  

टॅग्स :सिंधुदुर्गछत्रपती शिवाजी महाराजशाहू महाराज छत्रपतीमहाविकास आघाडीमहाराष्ट्र विकास आघाडी