Join us  

'भेटीगाठी म्हणजे मनं जोडण्याचा सोहळा'; राज ठाकरेंच्या भेटीनंतर श्रीकांत शिंदेंचं सूचक ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 5:11 PM

मनसेप्रमुख राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी ट्विट केलं आहे.

मुंबई- भाजपा, मनसे आणि बाळासाहेबांची शिवसेना या तीन पक्षांची महायुती होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यातच राजकीय नेत्यांच्या गाठीभेटीने याबाबतचे संकेत मिळत आहे. आज मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवतीर्थ निवासस्थानी जात मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली.

श्रीकांत शिंदे यांच्या राजभेटीमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. नुकतेच श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवली येथे मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात सदिच्छा भेट दिली. त्यामुळे मनसे आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये जवळीक वाढल्याचं दिसून येत आहे. 

राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी ट्विट केलं आहे. राजकारणाच्याही पलीकडे संस्कृती व आपुलकी असते. दिवाळी हा संस्कृती जपणारा सण. या निमित्ताने होणाऱ्या भेटीगाठी म्हणजे मने जोडण्याचा सोहळा. आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी सपत्निक सदिच्छा भेट घेत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या, असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मात द्यायची तर शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे सोबत असावी असे मानणारे भाजपमध्ये काही नेते आहेत. दुसरीकडे राज यांना सोबत घेऊन अधिक फायदा होईल की ते विरोधात लढले तर अधिक फायदा होईल याचा नीट अभ्यास करूनच निर्णय घ्यावा असे काही नेत्यांना वाटते. या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपच्या वतीने सातत्याने खासगी कंपन्यांकडून सर्वेक्षणे केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मनसे वेगळी लढल्यास होणारे मतांचे विभाजन भाजपच्या पथ्यावर पडेल की शिवसेनेच्या याचाही अभ्यास केला जात आहे.

मुंबईत एकत्र, इतरत्र स्वतंत्र?

१. मनसेला मुंबईत सोबत घ्यावे आणि ठाणे, नाशिक, पुणे महापालिकेत ते वेगळे लढले तरी चालेल अशी भूमिका भाजपच्या काही नेत्यांनी आणि विशेषतः पक्षसंघटनेत काम करणाऱ्यांनी पक्षाकडे मांडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली; मात्र पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यास विरोध दर्शविला आहे.

२. राज ठाकरे हे गर्दी खेचणारे नेते आहेत. फक्त मुंबईत युती केली तर मुंबईच्या प्रचारात ते भाजपचे कौतुक करतील आणि अन्यत्र युती नसेल तर जोरदार टीका करतील. त्यामुळे विसंवादाचे चित्र निर्माण होईल. तसेच राज ठाकरेदेखील युतीचा असा प्रस्ताव मान्य करणार नाहीत असे या वरिष्ठ नेत्यांना वाटते.

टॅग्स :श्रीकांत शिंदेराज ठाकरेमनसेशिवसेना