Join us

खासदार उन्मेष पाटलांनी भाजपा सोडली; फडणवीसांनी एका वाक्यात विषय संपवला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2024 7:45 PM

लोकसभेसाठी रणधुमाळी सुरू झाली असून, अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी प्रचारसभांना सुरुवात झाली आहे.

मुंबई - भाजपाने जळगावमधून विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचा पत्ता कट केला. त्याऐवजी स्मीत वाघ यांना लोकसभेच्या मैदानात उतरवले आहे. त्यामुळे, नाराज झालेल्या उन्मेश पाटील यांनी अखेर आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे, भाजपला हा जळगावमधून मोठा धक्का मानला जातो. मात्र, उन्मेष पाटील यांच्या शिवसेना उबाठा प्रवेशावर भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. तसेच, त्यांच्या पाठिशी लोकं नाहीत, असेही अप्रत्यक्षपणे म्हटले. दरम्यान, उन्मेष पाटील यांनी पक्षप्रवेशानंतर भावना व्यक्त करताना पक्षात होत असलेल्या अन्यायावर भाष्य केले.  

लोकसभेसाठी रणधुमाळी सुरू झाली असून, अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी प्रचारसभांना सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी काहीच दिवस शिल्लक आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तर, पक्षांतर आणि बंडखोरीच्या घटनांचे दैनिक वृत्त आहे. मुंबईतील मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज उन्मेष पाटील यांनी आपल्या हाती शिवबंधन बांधून घेतले. यावेळी खासदार संजय राऊतही उपस्थित होते. यावेळी त्यांनी "मला बदला घेण्यासाठी नाही तर बदल घडावा यासाठी राजकारण हवं आहे. पण दुर्दैवाने हे बदल्याचं राजकारण रोज मनाला त्रागा देणारं होतं" असं म्हणत पाटील यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांनीही प्रतिक्रिया दिली. 

वर्धा मतदारसंघात रामदास तडस यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गज नेते होते. यावेळी बोलताना फडणवीसांनी उन्मेष पाटील यांच्या भाजपा सोडण्यावर एका वाक्यात विषय मिटवला. ''जो मोदीजी के साथ नही, उसको जनता का साथ नही,'' असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उन्मेष पाटलांच्या शिवसेना उबाठा पक्षप्रवेशावर भाष्य केलं. फडणवीसांनी केवळ एका वाक्यात उन्मेश पाटील यांच्या भाजपा सोडण्यावर प्रतिक्रिया दिली. 

भाजपा सोडल्यानंतर काय म्हणाले पाटील

"महाराष्ट्राचा स्वाभिमान जागृत ठेवत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आज मी प्रवेश करत आहे. ठाकरे गटात प्रवेश करत असल्याने मला अनेकजण विचारत आहेत की, उमेदवारी मिळाली नाही म्हणून तुम्ही नाराज आहात का? मी या सर्वांना स्पष्टपणे सांगू इच्छितो की, राजकारण करताना आमदार, खासदार होणं हे एवढंच माझं ध्येय नव्हतं. मी खूप चांगल्या हेतूने काम करत होतो. परंतु, राजकारणात काम करताना, आमदार असताना आज आपण जी शासकीय योजनांची जत्रा पाहतोय, त्याचा पॅटर्न आम्ही चाळीसगावात राबवला होता. दुर्दैवाने किंमत मिळाली नाही."

"मी मागणी न करता मला मागील वेळेस लोकसभा उमेदवारी मिळाली. परंतु, यावेळी मला एका भावाने दगा दिला तरी दुसरा भाऊ म्हणजे शिवसेना माझ्याबरोबर आहे आणि याचा मला आनंद आहे. प्रामाणिकपणे काम करत असताना जनता आणि सरकारमधला दुवा म्हणून काम केलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला बदला घेण्यासाठी नाही तर बदलासाठी राजकारण हवं आहे. पण दुर्दैवाने हे बदल्याचं राजकारण रोज मनाला त्रागा देणारं होतं." 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसजळगावलोकसभा निवडणूक २०२४उद्धव ठाकरे