दीड महिना उलटला, तरी शिवाजी पार्कातील माती ‘जैसे थे’, 'एमपीसीबी' पालिकेवर कारवाई करणार का?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 10:24 AM2024-05-11T10:24:58+5:302024-05-11T10:26:26+5:30
शिवाजी पार्कातील लाल माती काढण्याच्या सूचना करून दीड महिना उलटला तरीही पालिकेने अद्याप काम पूर्ण केलेले नाही.
मुंबई : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) शिवाजी पार्कातील लाल माती काढण्याच्या सूचना करून दीड महिना उलटला तरीही पालिकेने अद्याप काम पूर्ण केलेले नाही. त्यामुळे शिवाजी पार्कातील रहिवाशांचा धूळ, मातीचा त्रास कायम आहे. एमपीसीबी आता विभागीय पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. दरम्यान, ‘धूळमुक्त हवा नाही, तर मतदानही नाही’, असा पवित्राही त्यांनी घेतल्याची आठवण करून दिली. मैदानातील लाल माती पालिकेने ५ एप्रिलपर्यंत काढणे अपेक्षित असताना १३ एप्रिलनंतर काम सुरू झाले. संथगतीने हे काम सुरू असून त्याला दोन-तीन महिने लागतील, ते आम्हाला मान्य नाही, असे रहिवासी संघटनेचे म्हणणे आहे.
मोकळ्या आणि स्वच्छ हवेत श्वास घेणे हा आमचा अधिकार आहे. पालिका प्रशासनाची दिरंगाई आमच्या हक्कापासून आम्हाला वंचित ठेवणार असेल तर त्यांना जाब कोण विचारणार? पालिका प्रशासनाला एमपीसीबी यासंदर्भात कारवाई करणार का?
- प्रकाश बेलवडे, शिवाजी पार्क रहिवासी संघटना
दादर पश्चिमेला असलेले छत्रपती शिवाजी महाराज मैदान हे विविध खेळांसाठी प्रसिद्ध आहे. तब्बल ९८ हजार चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या या मैदानात विविध क्लबच्या आठ खेळपट्ट्या आहेत. हे क्लब आपापल्या परिसराची देखभाल व स्वच्छता करतात. मात्र, त्याव्यतिरिक्त मैदानाचा परिसर दुर्लक्षितच असतो.
गेल्या कित्येक वर्षांत या समस्येवर तोडगा निघालेला नाही. रहिवासी संघटनेने एप्रिल महिन्यात प्रदूषण मंडळाला पत्र पाठवून यात लक्ष घालण्याची विनंती केली होती. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेला नोटीस पाठवून मैदानातून १५ दिवसांत माती काढण्याचे निर्देश दिले होते.