बीकेसीत उभे राहणार एमपीसीबीचे ‘पर्यावरण भवन’, एमएमआरडीएने ८० वर्षांच्या भाडेकराराने दिला भूखंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 07:56 IST2025-04-05T07:55:27+5:302025-04-05T07:56:00+5:30
Mumbai News: वांद्रे कुर्ला संकुलात (बीकेसी) आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबी) पर्यावरण भवन उभे राहणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) बैठकीत बीकेसीतील जी ब्लॉकमधील ३,४०० चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंड ४६८ कोटी रुपयांना एमपीसीबीला देण्याला मान्यता देण्यात आली आहे.

बीकेसीत उभे राहणार एमपीसीबीचे ‘पर्यावरण भवन’, एमएमआरडीएने ८० वर्षांच्या भाडेकराराने दिला भूखंड
मुंबई - वांद्रे कुर्ला संकुलात (बीकेसी) आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबी) पर्यावरण भवन उभे राहणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) बैठकीत बीकेसीतील जी ब्लॉकमधील ३,४०० चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंड ४६८ कोटी रुपयांना एमपीसीबीला देण्याला मान्यता देण्यात आली आहे. त्यातून बीकेसीत आता एमपीसीबीची प्रशासकीय इमारत उभी राहणार आहे.
एमएमआरडीए बीकेसीतील भूखंड ८० वर्षे भाडेकराराने देऊन प्रकल्पांच्या कामासाठी निधी उभारत आहे. त्यातील राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेल्या एमपीसीबीने त्यांच्या कार्यालयीन इमारतीसाठी एमएमआरडीएकडे भूखंडाची मागणी केली होती. त्यानुसार एमएमआरडीएने व्यावसायिक वापरासाठी सी-७९ या भूखंड वाटप केले.
दोन महिन्यांत भरावी लागणार २५ टक्के रक्कम
एमपीसीबी या भूखंडावर अतिरिक्त बांधकाम क्षेत्रफळासाठी अधिसूचनेतील अटींचे पालन केल्यानंतर पात्र होईल. एमपीसीबीला रक्कम जमा करण्यासाठी लवचीक सुविधा एमएमआरडीएने उपलब्ध करून दिली असून, भूखंडाच्या एकूण रकमेपैकी २५ टक्के रक्कम दोन महिन्यांच्या आत आणि उर्वरित ७५ टक्के रक्कम दहा महिन्यांमध्ये भरावी लागेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बीकेसी हे एक आघाडीचे व्यावसायिक आणि प्रशासकीय केंद्र म्हणून विकसित करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे. बीकेसीमध्ये पर्यावरण भवन उभे राहत असल्याने या दृष्टिकोनाला बळकटी मिळणार आहे. एमपीसीबीला करण्यात आलेले हे भूखंड वाटप पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा उभारण्याच्या आमच्या वचनबद्धतेशी सुसंगत आहे.
- डॉ. संजय मुखर्जी,
महानगर आयुक्त, एमएमआरडीए