मुंबई : भारतीय सुरक्षा दलाची मनोबल चांगले राहावे आणि त्यांचा ताणतणाव कमी व्हावा यासाठी पुढाकार घेऊन एमपॉवरच्या माध्यमातून एमपॉवर सुरक्षा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याचा १५०० रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना लाभ होणार आहे. शुक्रवारी एमपॉवर सुरक्षा उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. जयपूर-मुंबई धावत्या एक्सप्रेसमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये आरपीएफच्या एएसआयसह तीन प्रवाशांचा हकनाक बळी गेला होता.
त्यामध्ये आरोपी आरपीएफ जवान चेतन सिंह हा मानसिक रुग्ण असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे हा उपक्रम महत्वाचा आहे. डॉ. नीरजा बिर्ला यांच्या नेतृत्त्वात काम करत असलेल्या आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टचा एमपॉवर हा एक उपक्रम आहे. एमपॉवर सुरक्षा या संयुक्त उपक्रमाद्वारे रेल्वे सुरक्षा बलच्या मुंबई सेंट्रल विभागातील १५०० रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना मानसिक आरोग्यासंबंधी संपूर्ण सहकार्य करण्यात येणार आहे. या उपक्रमात केवळ प्रोफेशनल कौन्सेलिंग सोबत जनजागृती निर्माण केली जाणार आहे. टोल-फ्री हेल्पलाइनच्या सहाय्याने २४ तास मदत देण्यात येणार आहे.
परिपूर्ण तपासणी प्रक्रियेद्वारे त्यांना हवी तशी आणि लवकरात लवकर तसेच उच्च तणावाच्या स्थितीतही मानसिक आरोग्यासाठी मदत देण्यात येणार आहे. यावेळी पश्चिम रेल्वेचे प्रिन्सिपल चीफ परसनल ऑफिसर एस.के. अलबेला, पश्चिम रेल्वेचे आरपीएफ प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त पी.सी. सिन्हा, मुंबई सेंट्रलच्या आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त एसकेएस राठोड आणि एमपॉवरच्या कार्यान्वयन विभागाचे उपाध्यक्ष परवीन शेख आणि एमपॉवरच्या क्लिनिकल ऑपरेशन्स आणि रुरल इनिशिएटिव्ह विभागाचे एव्हीपी डॉ. अंबरिश धर्माधिकारी उपस्थित होते.