मुंबई - अनेक वेळा पालिका प्रशासनावर लोकप्रतिनिधी टिका करतात, परंतू त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचे कौतूक फारच क्वचित निदर्शनास येते. मात्र लोखंडवाला संकुल ते ठाकूर व्हिलेज यांना जोडणारा मार्ग मोकळा करत नागरिकांना दिलासा देत भर पावसात संरक्षक भिंत तोडल्याबद्दल उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी पालिका प्रशासनाला धन्यवाद दिले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेली अनेक वर्षे लोखंडवाला संकुल ते ठाकूर व्हिलेज यांना जोडणारा छोटासा रस्ता उघडण्यात आला नव्हता. अनेक वेळा पालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार व संयुक्त बैठका सुद्धा लावण्यात आल्या होत्या. कांदिवली पूर्व विधानसभा क्षेत्राचे आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेत हा प्रश्न उचलला होता.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर संयुक्त बैठक घेतली असतांना या तोडकामात पालिका प्रशासनाकडून दिरंगाई होत होती.
मात्र आज सकाळी भरपावसात पालिका प्रशासनाने सदर संरक्षक भिंत तोडून नागरिकांना मोठा दिलासा दिला. त्यामुळे लोकशाही वरचा नागरिकांचा दूर होत असलेला विश्वास उन्हा स्थापित होण्याची लक्षणे दिसत आहेत. याबद्दल खासदार गोपाळ शेट्टी यांनी परिमंडळ ७च्या उपायुक्त डॉ. भाग्यश्री कापसे व आर दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त ललित तळेकर यांना पत्र पाठवून याबद्धल समाधान व्यक्त करत त्यांना धन्यवाद दिले आहेत. लवकर येथील रस्ता रुंदीकरण करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.