Join us

झोपडपट्टी पुनर्वसन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी खासदार उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 4:10 AM

उत्तर मुंबईच्या सहा विधानसभा मतदार संघासह संपूर्ण मुंबईभर सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत आंदोलन करणार असल्याची माहिती खासदार गोपाळ शेट्टी यांनी लोकमतला दिली.

मनोहर कुंभेजकर

मुंबई: - झोपडपट्टीवासीयांना न्याय मिळण्यासाठी व झोपडपट्टीतील नागरिकांना हक्काचे पक्के घर मिळावे, तसेच २०१७ च्या झोपडपट्टी पुनर्वसन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी हे रस्त्यावर उतरले आहेत. संपूर्ण मुंबईभर त्यांचे आंदोलन सुरू झाले आहे. शनिवारी मालाड पश्चिम, मालवणी, राठोडी येथील तक्षशिला एसआरए इमारतीतील ४५ कुटुंबीयांना हक्काचे घर मिळण्यासाठी ते आंदोलनात बसले होते.

उत्तर मुंबईच्या सहा विधानसभा मतदार संघासह संपूर्ण मुंबईभर सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत आंदोलन करणार असल्याची माहिती खासदार गोपाळ शेट्टी यांनी लोकमतला दिली. खासदार गोपाळ शेट्टी यांनी सांगितले की, राज्याचे विरोधी पक्षनेते तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ मध्ये झोपडपट्टी पुनर्वसनसाठी नवीन जीआर काढला होता, त्याची अंमलबजावणी व्हावी, अशी माझी वर्तमान महाराष्ट्र राज्य सरकारकडे विनंती आहे. यासाठी सातत्याने पाठपुरावा करत प्रशासन, गृहनिर्माण मंत्री ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारीपर्यंत त्यांनी भेटी-गाठी केल्यानंतरही २०१७ च्या सदर कायद्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची जवाबदारी देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी आपल्याला दिली आहे. शनिवारपासून रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे.

टॅग्स :गोपाळ शेट्टी