एमपीएससी, बीएड सीईटी देणाऱ्यांना बॅच बदलून देणार; चंद्रकांत पाटील यांचा विद्यार्थ्यांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 06:36 AM2022-08-18T06:36:55+5:302022-08-18T06:37:03+5:30
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे या दोन्ही परीक्षा देणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई : राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) आणि बीएड सीईटी परीक्षा एकाच दिवशी आल्याने झालेल्या गोंधळावर आता राज्य सरकारने उपाय शोधला आहे. उमेदवारांना बॅच बदलून देण्यात येईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत जाहीर केले.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे या दोन्ही परीक्षा देणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सीईटी कक्षामार्फत बीएड व बीएचमसीटी या दोन विषयांची परीक्षा २१ ऑगस्ट २०२२ रोजी होणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षादेखील याच दिवशी होणार आहे. त्यामुळे या दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता असल्याने अनेकांनी याविषयी नाराजी व्यक्त केली होती.
अखेर याप्रश्नी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत निवेदन दिले. या दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी याबाबत त्वरित सीईटी कक्षास ई-मेलद्वारे कळवावे, जेणेकरून त्यांना सीईटीमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी बॅच बदलून देण्याची कार्यवाही करता येईल.