एमपीएससी उमेदवारांना परीक्षेवेळी किमान तीन पदरी मास्क अनिवार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:06 AM2021-03-20T04:06:12+5:302021-03-20T04:06:12+5:30
राज्य लाेकसेवा आयाेग : कोविड काळातील परीक्षेसाठी एसओपी जाहीर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एमपीएससीची राज्य पूर्व सेवा ...
राज्य लाेकसेवा आयाेग : कोविड काळातील परीक्षेसाठी एसओपी जाहीर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एमपीएससीची राज्य पूर्व सेवा परीक्षा २१ मार्च रोजी असून, परीक्षेवेळी कोविड संदर्भात घ्यावयाची काळजी या अनुषंगाने उमेदवारांना एमपीएससीकडून काही सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार उमेदवारांनी परीक्षा उपकेंद्रात प्रवेश करताना किमान तीन पदरी कापडाची मुखपट्टी (मास्क) घालणे अनिवार्य आहे. तसेच परीक्षा केंद्रात प्रवेश करताना मास्क, हातमोजे, सॅनिटायजरची लहान पिशवी असलेले प्रत्येकी एक किट उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येईल. ज्याचा वापर उमेदवारांनी दोन्ही सत्राकरिता करणे बंधनकारक आहे.
२१ मार्च २०२१ रोजी होणाऱ्या राज्य सेवा सेवा पूर्व परीक्षेसाठी राज्यात ८०० केंद्रे आहेत. तब्ब्ल २ लाख ८३ हजार विद्यार्थी ही परीक्षा देतील. राज्यातील कोविड १९च्या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता उमेदवारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आयोगाकडून विहित केलेल्या मानक कार्यप्रणालीनुसार (एसओपी) कोविड १९ ची लक्षणे असलेल्या उमेदवारांनी उपकेंद्रावरील पर्यवेक्षीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना याची आगाऊ कल्पना देणे गरजेचे आहे. जेणेकरून उमेदवारांना मुखपट्टी, हातमोजे, फेसशील्ड, मेडिकल गाऊन, शु कव्हर, मेडिकल कॅप इत्यादी असलेले पीपीई किट उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच त्या परीक्षार्थी उमेदवाराची स्वतंत्र कक्षात व्यवस्था करण्यात येईल.
शारीरिक अंतर राखण्याच्या आनुषंगाने विद्यार्थ्यांनी नियमांचे पालन करणे अनिवार्य असून, वापरलेले टिश्यू, मास्क, सॅनिटायजर्सची बाटली इत्यादी वस्तू परीक्षा उपकेंद्रावरील आच्छादित कचराकुंडीत टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
.................................