MPSC लिपिक परीक्षेचा निकाल जाहीर, राज्यात सांगलीचा 'विजय' पहिला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 09:38 PM2020-07-14T21:38:57+5:302020-07-14T21:40:16+5:30
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा लिपीक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी) या पदांसाठी 179 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.
मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या लिपिक पदांच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. त्यामध्ये, मुलांमध्ये व मागासवर्ग प्रवर्गातून सांगली जिल्ह्यातील विजय पोपट लाड प्रथम आले असून मुलींमध्ये अमरावतीच्या प्राजक्ता राजकुमार चौधरी यांनी बाजी मारली आहे. गेल्यावर्षी 6 व 10 ऑक्टोबर 2019 मध्ये गट-क सेवा मुख्य परीक्षा लिपीक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी) या संवर्गातील 179 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती.
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा लिपीक-टंकलेखक (मराठी-इंग्रजी) या पदांसाठी 179 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये मराठीचे 162 तर इंग्रजीचे 17 उमेदवार आहेत. या परीक्षेत सांगली जिल्ह्यातील विजय पोपट लाड हे राज्यात व मागास प्रवर्गातूनही राज्यात प्रथम आले आहेत. तर मुलींमध्ये अमरावतीची प्राजक्ता राजकुमार चौधरी या राज्यात अव्वल ठरल्या आहेत.
या परीक्षेत प्राविण्यप्राप्त तथा गुणवत्ताधारक खेळाडूंचा दावा केलेल्या उमेदवारांनी शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या 1 जुलै 2016 च्या शासन निर्णयानुसार तसेच त्यास अनुसरून प्रसिध्द केलेल्या 18 ऑगस्ट 2016 व 11 मार्च 2019 च्या शुध्दीपत्रकातील तरतुदीनुसार शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार विषयांकीत गट- क पदासाठी प्रमाणपत्र द्यावयाचे आहे. दरम्यान, समांतर आरक्षणासह अन्य मुद्यांवरील न्यायालयात तथा न्यायाधिकरणाकडे दाखल करण्यात न्यायिक प्रकरणांवरील अंतिम निकालाच्या अधीन राहून हा निकाल जाहीर केल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
उत्तरपत्रिका पडताळणीसाठी दहा दिवसांची मुदत
महाराष्ट्र गट- क सेवा मुख्य परीक्षा लिपीक-टंकलेखक परीक्षेतील ज्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे. त्यांनी गुणपत्रिका प्रोफालईमध्ये पाठविलेल्या दिनाकांपासून दहा दिवसांत आयोगाला ऑनलाइन अर्ज करावा, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पष्ट केले आहे.