लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून एमपीएससीची तयारी करण्यासाठी ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशात २ ते ३ दिवस आधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पत्र काढून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याने एमपीएससीचे उमेदवार राज्यभरात रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहेत.
१४ मार्च २०२१ रोजी होणाऱ्या राज्य सेवा सेवा पूर्व परीक्षेसाठी राज्यातून ८०० केंद्रावर तब्ब्ल २ लाख ८३ हजार विद्यार्थी परीक्षा देणार होते. मात्र आधीच ४ वेळा लांबणीवर पडलेल्या या परीक्षेसंबंधी आयोगाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. आधीच आयोगाच्या नव्या निर्णयानुसार, ‘एमपीएससी’च्या शासकीय पदांसाठी खुल्या संवर्गातील उमेदवाराला परीक्षेच्या सहा संधी उपलब्ध होतील, तर इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) उमेदवारास कमाल नऊ संधी उपलब्ध राहतील. त्याचप्रमाणे अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारास कमाल संधींची मर्यादा लागू राहणार नाही, असे ‘एमपीएससी’ने स्पष्ट केल्याने परीक्षा देण्याच्या संधींवर मर्यादा आल्याने विद्यार्थी चिंतेत आहेत. त्यात पुन्हा पुन्हा लांबणीवर परीक्षा गेल्याने त्यांच्या संयमाचा बांध फुटल्याच्या प्रतिक्रिया ते देत आहेत.
----------------------
प्रतिक्रिया
कोरोनाच्या नावाखाली महाराष्ट्र शासन विद्यार्थ्यांच्या आयुष्यासोबत खेळू पाहत आहे. कोरोना असतांना जर विधिमंडळाचे कामकाज होऊ शकते तर मग एमपीएससीच्या परीक्षा का नाही..? की शासनाचे अपुरे नियोजन असल्यामुळे या पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयाचा आपण पुन्हा विचार करावा अन्यथा प्रशासकीय सेवेत जाऊ इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यांवर आंदोलन करण्याची पाळी येईल.
वैभव एडके, महाराष्ट्र स्टुडन्ट्स वेल्फेअर असोसिएशन
...... .....
राज्य सरकारला हा निर्णय खूप महागात पडणार आहे. २८ फेब्रुवारी रोजीची परीक्षा घोटाळ्याची घेता येते, मग अचानक राजसेवा परीक्षा रद्द का? मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला शब्द न पाळून लाखो विद्यार्थ्यांचे जीवन अंधकारमय केले आहे.
एमपीसीसी स्टुडण्ट्स राईट्स संघटना
......
जर परीक्षा घ्यायच्याच नसतील तर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी नेमके काय करावे हे सरकारनेच सांगावे. आधीच विद्यार्थ्यांचे १ वर्ष परीक्षा न दिल्याने वाया गेले आहे. दहावी, बारावी, गेट, आयबीपीएस परीक्षा होऊ शकतात, अधिवेशन होऊ शकते, निवडणूक होऊ शकतात तर एमपीएससी परीक्षा का नाही ?
सरकरचे डोके ठिकाणावर नसल्याचेच यावरून दिसून येत आहे.
एमपीएससी सिव्हिल इंजिनिअर्स
.......
लोकसेवा आयोगाने एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा मनमानी निर्णय तातडीने मागे न घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उद्या शुक्रवारी आयोगाच्या कार्यालयावर धडक आंदोलन करू... अॅड. अमोल मातेले, अध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई
..... .....
महाराष्ट्र लोकसेवा आयोग १४ मार्चला परीक्षा घ्यायला तयार आहे, अशी माहिती एमपीएससीकडून मिळाली आहे. मात्र राज्य सरकारची परवानगी नसल्याने परीक्षा होणार नाही म्हणजे सरकारकडूनच आडकाठी करण्यात येत आहे. मुख्य सचिव हे आपत्ती व्यवस्थापन प्रभागाचे प्रमुख आहेत. त्यांनाच नकोत ह्या परीक्षा अो लक्षात येत आहे. एकूणच हे सरकार विद्यार्थी विरोधी आहे.त्यामुळे एकतर परीक्षा घ्या नाहीतर मुख्यमंत्री, मुख्य सचिव राजीनामे द्या.
सरकार आणि प्रशासन यामध्ये खूप मोठा समन्वयाचा अभाव आहे. या परीक्षा झाल्याच पाहिजेत.
उमेश कोरराम
स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया.
...... ....
आधीच केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे बेरोजगारी प्रचंड वाढलेली असताना, राज्य सरकारचे हे पाऊल म्हणजे आगीतून फुफाट्यात अशी अवस्था आहे. या निर्णयाविरोधात सर्व विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत आणि त्यांचा क्षोभ उसळला आहे. याची दखल आयोगाने आणि सरकारने घ्यावी, आणि हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अन्यथा एसएफआय याविरोधात तीव्र आंदोलन छेडणार आहे.
बालाजी कलेटवाड , राज्याध्यक्ष, एसएफआय
...... .....
गेल्या वर्षभरात एमपीएससी परीक्षा देणारा विद्यार्थी सगळ्यात जास्त भरडला गेला आहे. यातही परीक्षेला आयोगाकडून संधींची अट घालण्यात आली आहे. आधी ज्या नियुक्त्या झाल्या आहेत त्या काही ना कारणाने रखडल्या आहेत. त्यामुळे आधीच चिंतेत असलेल्या आमच्यासारख्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा पुढे ढकलून खिल्ली उडवण्याचा हा प्रकार आहे.
विजय खेडकर, एमपीएससी परीक्षा उमेदवार