काेराेनाच्या भीतीमुळे विद्यार्थ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; आयोगाकडून प्रवेशपत्र जारी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एमपीएससीची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित ‘गट ब’ ची रविवारची परीक्षा देणारे विद्यार्थी सध्याची कोरोना संसर्गाची परिस्थिती पाहता परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून निवेदन दिले आहे. दुसरीकडे लोकसेवा आयोगाकडून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेशपत्राची प्रिंट काढून घ्या, त्यावरच परीक्षेला प्रवेश दिला जाईल, अशा सूचनांचे पत्रक काढून परीक्षा रविवार ११ एप्रिलला होणार, यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे.
एमपीएससीची परीक्षा देणारे अनेक विद्यार्थी मुंबई, पुण्यात अभ्यास करतात. मात्र, कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे ते आपल्या मूळ गावी परतले आहेत. मिनी लॉकडाऊनच्या निर्बंधांमुळे केंद्रांवर वेळेत कसे पोहचणार? काहींच्या घरी त्यांचे नातेवाईक पॉझिटिव्ह आल्याने परीक्षा कशी देऊ शकणार ? परीक्षा दिली नाही तर काहींची असलेली ही शेवटची संधी असल्याने ती मोजली जाणार का ? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केले आहेत. एमपीएससी समन्वय समितीने यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांच्या अडचणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ११ तारखेची परीक्षा घेतली जावी की नाही, यासंदर्भात विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण घेतले असता १ हजार ९३ तरुणांनी नको (६५%) तर ५९६ (३५%) विद्यार्थ्यांनी परीक्षा व्हावी, असे मत मांडले. काही विद्याथ्यार्ंनी परीक्षा अगदी जवळ आल्याने परीक्षा होऊन जाऊ द्या, असे मत व्यक्त केले.
ज्या केंद्रांवर परीक्षा द्यायच्या आहेत ती केंद्रे मूळ घरापासून दूर असल्याने आणि त्याचदिवशी लॉकडाऊन असल्याने विद्यार्थी चिंतेत आहेत. मात्र, योग्य प्रवेशपत्राच्या आधारावर उमेदवारांना प्रवासासाठी सूट मिळणार आहे, असे सरकारच्या नियमावलीत स्पष्ट करण्यात आल्याने आयोग निर्णयावर ठाम असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
* परीक्षेसंदर्भातील सूचना जारी
एमपीएससीने बुधवारी परिपत्रक काढून उमेदवारांनी प्रवेशपत्राची मूळ प्रत, आधारकार्ड, पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, यापैकी कोणतेही मूळ ओळखपत्र व छायांकित प्रत सोबत आणण्याच्या सूचना केल्या आहेत. परीक्षा केंद्रात मोबाइल घेऊन जाण्यास परवानगी नाही, तसेच उपकेंद्राच्या आवारात नातेवाईकांनी गर्दी न करण्याची सूचनाही आयाेगाने केली आहे.
* चाैकट
गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा - ११ एप्रिल
परीक्षेला बसणारे विद्यार्थी - ४.२३ लाख
परीक्षा केंद्रे - १५००
-----------------------------