उद्या होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:05 AM2021-04-10T04:05:57+5:302021-04-10T04:05:57+5:30
परिस्थिती पाहून नवीन तारखा करणार जाहीर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी म्हणजे ११ एप्रिल ...
परिस्थिती पाहून नवीन तारखा करणार जाहीर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी म्हणजे ११ एप्रिल २०२१ रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ची संयुक्त पूर्व परीक्षा २०२० पुढे ढकलण्याचा निर्णय शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. राज्यातील कोरोना स्थिती लक्षात घेऊन या परीक्षेच्या तारखा एमपीएससीमार्फत नव्याने घोषित केल्या जातील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आणि विद्यार्थी आणि विविध राजकीय पक्षांचे यासंदर्भातील मत आणि मागण्या विचारात घेऊन हा निर्णय एकमताने घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. ही परीक्षा पुढे ढकलल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही तसेच परीक्षा फॉर्म भरतानाचे विद्यार्थ्यांचे वय गृहित धरले जाणार असल्याने वयाचीही अडचण येणार नसल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
* कही खुशी, कही गम!
- परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत हाेती. एमपीएसी समन्वय समिती, महाराष्ट्र आणि प्रातिनिधीक स्वरूपात सोलापूर, अहमदनगर, सातारा, हिंगोली, यवतमाळ, मुंबई, पुणे, लातूर, नागपूर, कोल्हापूर यासह राज्यभरातील विविध शहरांतील विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती.
- एकीकडे अनेक विद्यार्थी परीक्षा पुढे ढकलल्याने सरकारचे आभार मानत असताना दुसरीकडे अवघ्या २ दिवसांवर परीक्षा आली असताना सरकारने ती रद्द केल्याने काही विद्यर्थ्यांमध्ये नाराजी आहे. मुंबई, पुणे केंद्रांवर परीक्षा देण्यासाठी आलेले विद्यार्थी नाराज आहेत. परीक्षा होणार म्हणून आम्ही इतके दिवस दुसऱ्या शहरात जीव मुठीत घेऊन राहत होतो. आता मूळ गावी परतावे लागेल आणि पुन्हा परीक्षसेसाठी यावे लागेल. एकदा परीक्षा होऊन गेली असती तर सुटलो असतो, असे मत त्यांनी मांडले.
* चौकट
परीक्षेला बसणारे विद्यार्थी - ४. २३ लाख
परीक्षा केंद्रे - १५००
-------------------------------------