मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एप्रिल व मे महिन्यात होऊ घातलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० व महाराष्ट्र दुय्यम सेवा राजपत्रित , गट ब, संयुक्त पूर्व परीक्षा २०२० या दोन्ही परीक्षापुन्हा पुढे ढकलल्या आहेत. या संबंधित सूचना आणि परिपत्रक विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जारी करण्यात आले आहे. सुधारित वेळापत्रक लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावर जारी करण्यात येईल आणि नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे सूचना देण्यात येईल अशी माहिती एमपीएससीच्या उपसचिवांनी दिली आहे.
या दोन्ही परीक्षा येत्या २६ एप्रिल आणि १० मे रोजी होणार होत्या, मात्र राज्यातील सध्याची कोरोनाबाधीतांची वाढती संख्या पाहून या परीक्षा सुरक्षेच्या कारणास्तव पुढे ढकलण्यात आली असल्याची महिती देण्यात आली आहे. नवीन वेळापत्रक आणि सुचनासाठी उमेदवारांनी आयोगाचे संकेतस्थळ पहावे अशी सूचनाही आयोगाकडून करण्यात आली आहे. कोरोनामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालयांसह सर्व अभ्यासिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे सर्व विद्यार्थी गावाकडील घरी जाण्याशिवाय पर्याय नव्हता. विद्यार्थी सुरक्षेच्या कारणास्तव आणि लॉकडाऊनमुळे आयोगाने ५ एप्रिल रोजी होणारी परीक्षा २६ एप्रिल व ३ मे रोजी होणारी परीक्षा १० मे रोजी घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सध्या राज्यातील परिस्थिती पाहता ती आणखी पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.