एमपीएससीला डमी परीक्षार्थी, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 06:29 AM2018-03-30T06:29:51+5:302018-03-30T06:29:51+5:30
एमपीएससी - २०१७च्या परीक्षेला डमी उमेदवार बसविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मुंबई : एमपीएससी - २०१७च्या परीक्षेला डमी उमेदवार बसविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी डमी उमेदवारासह तिघांविरुद्ध मरिन ड्राइव्ह पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. आनंदा नागनाथ कोलेवाड , नरसफा बिराजदार, संदीप विजयकांत भुसारे या तिघांविरुद्ध बुधवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मरिन ड्राइव्ह पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क गट-क - २०१७ची परीक्षा २४ सप्टेंबर रोजी पार पडली. यादरम्यान चर्चगेट येथील परीक्षा केंद्रात नांदेडच्या आनंदा या उमेदवाराने परीक्षेसाठी संदीप विजयकांत भुसारेला त्याच्या जागेवर पाठविले. भुसारे हा मूळचा कोल्हापूरचा रहिवासी आहे. नरसफा बिराजदार याने आनंदाची ओळख भुसारेसोबत करून दिली होती. त्याच्या मध्यस्थीने आनंदाने डमी उमेदवार बसविल्याचे तपासात उघड झाले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे उपसचिव सुनील हरिश्चंद्र अवताडे (४९) यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी या प्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
यापूर्वी भायखळा पोलिसांनीही एमपीएससीच्या परीक्षेत डमी उमेदवार बसविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांत भुसारे आणि बिराजदारला अटक करण्यात आली होती. बिराजदार हा यामागील मुख्य सूत्रधार असल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी आरोपींकडे अधिक तपास सुरू असल्याची माहिती मरिन ड्राइव्ह पोलिसांनी दिली.