मुंबई - MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती मिळाली नाही. शेवटी नैराश्यामुळे पुण्यातील एका मुलाने गेल्या महिन्यात आत्महत्या केली होती. यावरून ठाकरे सरकारवर भाजपसह अन्य विरोधी पक्षांची चांगलीच टीकेची झोड उठवली. त्यानंतर ३१ जुलैपर्यंत एमपीएससीच्या रिक्त सदस्यांच्या जागा भरू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. मात्र, 31 जुलै येऊन गेल्यानंतरही अद्याप जागा न भरल्याने विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त होत आहे. ट्विटरवरुन एमपीएससीचे उमेदवार उपमुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारत आहेत.
एमपीएससीच्या एका विद्यार्थ्याने ट्विटरवरुन विचारलेल्या प्रश्नाला आता आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे. विकास आर. भारती या विद्यार्थ्याने प्रश्न विचारत, 31 जुलैपर्यंत आयोगातील सदस्यांची नियुक्ती होईल, या घोषणेचं काय झालं? असा प्रश्न विचारला होता. त्यावर, उपमुख्यमंत्री अजित पवार हे शब्द पाळणारे नेते आहेत. #MPSC च्या सदस्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी सरकारने ३१ जुलैपूर्वीच राज्यपाल महोदयांकडं सदस्यांची यादी पाठवलीय. ती विधान परिषदेच्या आमदारांची यादी नसल्याने महामहीम राज्यपाल महोदय तातडीने मंजूर करतील, असा विश्वास आहे, असे रोहित पवार यांनी ट्विटरवरुन म्हटले आहे. म्हणजेच, सरकारने नियुक्तीसंदर्भात यादी पाठवली असून ती राज्यापालांकडे आहे, असेही पवार यांनी सूचवले आहे.
अजित पवारांकडून उमेदवारांची दिशाभूल
३१ जुलैपर्यंत राज्यातील रिक्त जागा एमपीएससीद्वारे भरू, अशी घोषणा त्यांनी सभागृहात केली होती. पण, सभागृहातून बाहेर पडताच MPSC आयोगावरील रिक्त सदस्यांच्या चार जागा भरू, असा त्यांनी शब्द फिरवला. खोटे बोलत अजित पवारांनी सभागृहाची दिशाभूल केली. ३१ जुलै उलटून गेला तरीही MPSC ची कोणतीही परीक्षा झालेली नाही. तसेच आयोगावरील सदस्यांच्या रिक्त जागाही भरलेल्या नाहीत. त्यामुळे या सरकारला MPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत काहीच देणेघेणे नाही, असे आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.
मुलाच्या पुनर्वसनाचीच चिंता
अजित पवार यांच्यावर निशाणा साधत भाजप आमदाराने राज्यात पुन्हा स्वप्नील लोणकर प्रकरणाची पुनरावृत्ती व्हावी अशी अपेक्षा सरकारला आहे काय? उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फक्त त्यांच्या मुलाच्या पुनर्वसनाची चिंता आहे काय, अशी विचारणा केली आहे.