एमपीएससी उत्तीर्ण तरुणाचे बिंग फुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 05:47 AM2019-04-27T05:47:47+5:302019-04-27T05:48:11+5:30

माटुंगा पोलिसांनी ठोकल्या बेड्या; परीक्षेस डमी बसवल्याचे उघड

The MPSc passed a bing festoon | एमपीएससी उत्तीर्ण तरुणाचे बिंग फुटले

एमपीएससी उत्तीर्ण तरुणाचे बिंग फुटले

googlenewsNext

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) लिपिक पदाच्या परीक्षेत डमी बसवून मुंबईचा तरुण परीक्षा उत्तीर्ण झाला. त्याला नोकरीही मिळाली; पण कामच येत नसल्याने, अधिकाऱ्यांना संशय आला. त्यानंतर या प्रकाराची पोलखोल झाली; आणि तरुणाची रवानगी थेट पोलीस कोठडीत झाली. मनोज तोंडवळे असे या तरुणाचे नाव असून माटुंगा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे.

२०१७ मध्ये झालेल्या एमपीएससीच्या लिपिक/ टंकलेखक पदाच्या परीक्षेत मनोज तोंडवळे याने डमी उमेदवार बसवला. लाखो रुपये खर्च करून त्याने आधार कार्डसह विविध कागदपत्रे बनावट तयार करून घेतली. परीक्षेत चांगल्या गुणांनी पास झाल्यानंतर तो एमपीएससीच्या केंद्रात लिपिकपदी रुजू झाला. परीक्षा स्वत: दिली नसल्यामुळे त्याला कामाचा अंदाज नव्हता. त्याला काहीच काम येत नसल्याने तेथीलच उपायुक्त सुनील हरिश्चंद्र यांना संशय आला. त्यांनी, कुठलेच काम कसे माहिती नाही? परीक्षेत पास कसा झाला? असे विचारत कागदपत्रे तपासली. कागदपत्रांवरून चौकशी केली असता त्याने परीक्षेला डमी उमेदवार बसवल्याचे उघडकीस आले. त्यानुसार त्यांनी ९ फेब्रुवारी रोजी माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

त्यांच्या तक्रारीनुसार माटुंगा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यांच्या तपासातही त्याने डमी उमेदवार बसवून नोकरी मिळविल्याचे स्पष्ट होताच १८ एप्रिल रोजी त्याला अटक करण्यात आली. शुक्रवारी त्याला कुर्ला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याच्या कोठडीत वाढ केली आहे.

मोठे रॅकेट असल्याचा पोलिसांना संशय
पोलिसांना यामागे मोठे रॅकेट असल्याचा संशय आहे. त्यानुसार ते संबंधितांचा शोध घेत आहेत. या रॅकेटने आतापर्यंत किती जणांना अशा पद्धतीने परीक्षेस बसविले, त्यांच्याकडून किती पैसे घेतले, यामागे एमपीएससीच्या कुठल्या अधिकाºयाचा सहभाग आहे का? या दिशेनेही पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: The MPSc passed a bing festoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.