एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मनात रविवारच्या परीक्षेविषयी धाकधूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:06 AM2021-04-07T04:06:39+5:302021-04-07T04:06:39+5:30

लॉकडाऊनमुळे संधी हुकण्याची भीती; आयोगाकडून प्रवेशपत्र जारी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) महाराष्ट्र दुय्यम सेवा ...

MPSC students are worried about Sunday exams | एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मनात रविवारच्या परीक्षेविषयी धाकधूक

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मनात रविवारच्या परीक्षेविषयी धाकधूक

Next

लॉकडाऊनमुळे संधी हुकण्याची भीती; आयोगाकडून प्रवेशपत्र जारी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्‍त पूर्वपरीक्षा रविवारी (दि. ११) होणार असून राज्यभरातील ४ लाख २३ हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. मात्र शनिवार, रविवारी राज्यात कडक लॉकडाऊनचे निर्देश राज्य सरकारने जारी केल्याने या परीक्षांना आपण पोहोचू शकणार की नाही, अशी धाकधूक विद्यार्थ्यांमध्ये आहे. दुसरीकडे, आयोगाने परीक्षेची प्रवेशपत्रे जारी केल्याने परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लागू केलेल्या कडक निर्बंधानुसार शनिवार, रविवारी कडक संचारबंदी असणार आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थाही बंद ठेवली जाईल आणि त्यामुळे परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचता येणार नाही, अशी भीती विद्यार्थ्यांना आहे. कडक संचारबंदी असल्याने परजिल्ह्यांतील मुलांना त्या ठिकाणी राहण्यासाठी अडचणी येणार आहेत, अशी परिस्थिती असतानाही परीक्षा घेतल्यास बहुतांश विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही. यामुळे विद्यार्थ्यांची नोंदणी झाल्याने त्यांची संधी मोजली जाईल व एक संधी वाया जाईल, अशी भीती विद्यार्थ्यांना आहे. त्यामुळे आयोगाने ही परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन सर्व्हेदेखील केला असून, त्यात ७९ टक्‍के विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलावी, असे मत नोंदविले आहे.

चाैकट

- गट-ब संयुक्‍त पूर्वपरीक्षा : ११ एप्रिल

- परीक्षेला बसणारे विद्यार्थी : ४.२३ लाख

- परीक्षा केंद्रे : १५००

* कोविड केअर किट घालून द्यावी लागणार परीक्षा

परीक्षेसाठी एका वर्गखोलीत २४ विद्यार्थी असतील. विद्यार्थ्यांना परीक्षा देताना कोविड केअर किट घालावे लागेल. पेपर सुरू होण्याच्या दीड तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. थर्मल स्क्रीनिंग गनद्वारे विद्यार्थ्यांच्या तापमानाची नोंद घेतली जाईल. पर्यवेक्षकांना कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असणार असून, लसीकरण करून घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

...तर आणखी एक संधी द्यावी !

एमपीएससी परीक्षेसाठी वाहतूक व्यवस्थेबाबत स्पष्टता यायला हवी. परीक्षा होणार असेल तर कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत; तसेच बाधित मुलांची वयोमर्यादा संपत असेल तर त्यांना आणखी एक संधी देण्याबाबत सरकारने विचार करावा, अशी विनंती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली.

-------------------------------

Web Title: MPSC students are worried about Sunday exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.