मुंबई : एमपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा इंग्रजीसोबत मराठीतूनही घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. त्यानुसार एमपीएससीच्या तांत्रिक पदांच्या परीक्षा मराठीत घेण्याबाबत राज्य शासन नियोजन करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.
आ. मिलिंद नार्वेकर यांनी महाभरती वेबसाइटमध्ये जनरल ॲग्रीकल्चर व ॲग्रीकल्चर सायन्स या दोन विषयांची परीक्षा मराठीतून घेण्यात याव्या याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, अभियांत्रिकी व कृषीविषयक तांत्रिक विषयांची पुस्तके मराठीत उपलब्ध नसल्याने या विषयांची परीक्षा मराठीत घेता येत नव्हती; परंतु आता अभियांत्रिकी शिक्षण मराठीत घेण्याची परवानगी असून ती पुस्तके मराठीत उपलब्ध आहेत. त्यामुळे त्या परीक्षा मराठीत घेण्याचे नियोजन आहे.