मुंबई – MPSC परीक्षा उत्तीर्ण करूनही नोकरी न मिळाल्याने पुण्यात एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर सर्वच स्तरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने स्वप्निल लोणकर या २४ वर्षीय तरूणानं गळफास घेतला. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत MPSC मायाजाल आहे. यात पडू नका असा उल्लेख केला आहे.
स्वप्निलच्या आत्महत्येनंतर आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी फेसबुकवर त्यांचा अनुभव शेअर केला आहे. शिवदीप लांडे यांनी म्हटलंय की, केवळ नोकरीच्या परीक्षेत पराभव होणं म्हणजे अंत होत नाही. आयुष्य खूप सुंदर आणि आशावादी आहे. आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात तेव्हा वाटतं आता आपण थकलोय. पुढे काहीच दिसत नाही. परंतु अंधारानंतर प्रकाश दिसतो. मला देखील असा अनुभव खूपदा आला आहे. हिंमत न हरता मी पुढे गेलो आणि शेवटी आज इथपर्यंत येऊन पोहचलो आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच जर मला कोणती सरकारी नोकरी मिळाली नसती तर मी अन्य काही रोजगार करून माझ्या कुटुंबाची जबाबदारी आनंदाने सांभाळली असती. कारण माझ्या आयुष्यावर केवळ माझा हक्क नाही. प्रत्येक पराभवातून आपल्याला ताकद घ्यायला हवी. विश्वास ठेवा, पराभवातून विजय साकारण्याच्या जिद्दीला हे जग सलाम करतं असंही आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी सांगितले आहे.
काय आहे प्रकरण?
स्वप्निल लोणकर या तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. स्वप्निलचे वडील सुनील लोणकर यांचा शनिवार पेठेत बिल बुक बाईंडिंगचा प्रिटिंग प्रेसचा छोटा व्यवसाय आहे. ते व त्यांची पत्नी असे दोघे हा व्यवसाय पाहतात. स्वप्निलने स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आहे. स्वप्निलचे आईवडिल हे नेहमीप्रमाणे बुधवारी (३० जून) सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले. त्यानंतर त्यांची मुलगी दुपारी साडेचार वाजता घरी आली. तेव्हा स्वप्निलने त्याच्या खोलीमध्ये गळफास घेतल्याचे तिच्या निदर्शनास आले. तिने हा प्रकार आईवडिलांना कळविला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
स्वप्निलचे शिक्षण पूर्ण झाल्यापासून तो एमपीएससीच्या(MPSC) परीक्षेची तयारी करीत होता. तो २०१९ च्या पूर्व व मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे त्याची मुलाखत झाली नव्हती. त्याबरोबर त्याने २०२० मध्येही एमपीएससीची परीक्षा दिली होती. त्यातील पूर्वपरीक्षा तो उत्तीर्ण झाला होता. वाढते वय आणि नोकरी करूनही कधीही फिटू न शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या व इतरांच्या वाढत्या अपेक्षा या सगळ्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे त्याच्या ‘सुसाईड नोट’वरून दिसून येत आहे.