मुंबई : राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) ११ ऑक्टोबर रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊन तात्पुरता प्रश्न सोडवला. मात्र, आता सोबतच नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या आणखी दोन परीक्षा रद्द करण्यात आल्याचे एमपीएससीकडून मंगळवारी जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक यथावकाश जाहीर करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. एमपीएससीच्या अचानक परीक्षा रद्द च्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना धक्का बसला असून नव्या वर्षांच्या शैक्षणिक प्रवेशाबाबत सरकारने भूमिका अजूनही स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा जीव टांगणीला लागला आहे.कोरोनामुळे राज्य सेवेची परीक्षा दोन वेळा पुढे ढकलली होती. त्यानंतर मराठा आरक्षणास स्थगिती आल्यापासूनच ११ ऑक्टोबरची राज्य सेवा परीक्षेचे काय होणार, याबाबत विद्यार्थी संभ्रमात असताना सरकारकडून ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर आता १ नोव्हेंबरला असणारी अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि २२ नोव्हेंबरला दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ची परीक्षा ही एमपीएससीकडून रद्द करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. तब्बल ४ लाख ४० हजार विद्यार्थी या दोन्ही परीक्षा देणार आहेत तसेच वेळापत्रकाप्रमाणे या परीक्षा पार पाडण्यासाठीची प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात पोहचली असताना एमपीएससीकडून या परीक्षा रद्द करण्यात आल्याने पुढील परीक्षांवर ही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मात्र परीक्षा अशाच पुढे ढकलत राहिल्या तर पुढे नक्की काय ? केव्हा होणार या परीक्षा याबाबत विद्यार्थी पालकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.वेळापत्रकाप्रमाणे या परीक्षा पार पाडण्यासाठीची प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात पोहचली असताना एमपीएससीकडून या परीक्षा रद्द करण्यात आल्याने पुढील परीक्षांवर ही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. कधी कोरोना काळामुळे तर कधी समाजातील आरक्षणाच्या तिढ्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर याचा परिणाम होत असल्याची प्रतिक्रिया स्पर्धा परीक्षार्थीनी व्यक्त करत आहेत.