एमपीएससीची १४ मार्चची राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:09 AM2021-03-13T04:09:15+5:302021-03-13T04:09:15+5:30
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आयोगाचा निर्णय; विद्यार्थ्यांचा संताप लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेल्या वर्षभरापासून राज्यसेवा पूर्व परीक्षा वारंवार ...
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आयोगाचा निर्णय; विद्यार्थ्यांचा संताप
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या वर्षभरापासून राज्यसेवा पूर्व परीक्षा वारंवार पुढे ढकलली जात असताना आता पुन्हा १४ मार्च रोजी होणारी परीक्षा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने पुढे ढकलली आहे. राज्यात कोराेनाचा संसर्ग वाढत असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध आल्याने परीक्षा घेणे योग्य नाही, असे पत्र पुनर्वसन विभागाने १० मार्चला ‘एमपीएससी’ला दिले होते. त्यांच्या सूचनेनुसार ही परीक्षा पुढे ढकलल्याचे परिपत्रक एमपीएससीने गुरुवारी काढले. मात्र, एमपीएससीने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
गतवर्षी एप्रिल २०२०मध्ये राज्यसेवा व इतर परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या. त्यानंतर मराठा आरक्षणावर स्थगिती येण्यापूर्वी राज्यसेवा पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबरला, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर रोजी आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ची परीक्षा २२ नोव्हेंबर रोजी होणार होती. मात्र, या तिन्ही परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या. त्यानंतर परीक्षा घेण्यासाठी हाेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार, राज्यसेवा पूर्व परीक्षा १४ मार्च, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २७ मार्च रोजी, तर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ची परीक्षा ११ एप्रिल रोजी होईल, असे आयोगाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले. त्यानंतर आता १४ मार्चची परीक्षा अवघ्या तीन दिवसा़ंवर आलेली असताना काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली. अभियांत्रिकी सेवा व अराजपत्रित गट ब या परीक्षेबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. यावर एमपीएससी उमेदवारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. राज्यसेवेची परीक्षा आधीच चारवेळा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी होती. आता पुन्हा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने लाखो विद्यार्थ्यांना त्रास होणार आहे. यातून करिअरचा प्रश्न निर्माण झाल्याचे मत ‘एमपीएससी’च्या उमेदवारांनी व्यक्त केले.
.................................