आरेत स्वत:च्या जबाबदारीवर मेट्रो कारशेडचे काम करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 01:48 AM2018-04-28T01:48:14+5:302018-04-28T01:48:14+5:30
उच्च न्यायालय : एमएआरसीएलला दिला इशारा
मुंबई : याचिका प्रलंबित असल्याने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोेरेशन लि.(एमएमआरसीएल)ने आरे कॉलनीत सुरू असलेले मेट्रो कारशेडचे काम स्वत:च्या जबाबदारीवर सुरू ठेवावे, असा इशारा उच्च न्यायालयाने एमएमआरसीएला शुक्रवारी दिला.
आरे कॉलनीत सुरू असलेल्या मेट्रो कारशेडच्या कामाला रहिवाशांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. एस.सी. धर्माधिकारी व न्या. पी.डी. नाईक यांच्या खंडपीठासमोर होती. आरे परिसर पर्यावरणीय दृष्टीने संवेदनशील असल्याने येथे कुठलेही बांधकाम केले जाऊ शकत नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.
एमएमआरसीएलने स्वत:च्या जबाबदारीवर काम करावे, पण हे प्रकरण अंतिम निकालाच्या अधीन राहील, असे न्यायालयाने म्हटले आहे. मेट्रोसाठी सरकारने आरक्षण बदलले, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे, तर यापूर्वी एमएमआरसीएलने आपल्या प्रतिज्ञापत्रात आरेचा २५ हेक्टर भूखंड आरक्षित जंगल म्हणून जाहीर केला नव्हता, असे म्हटले. न्यायालयाने पुढील सुनावणी १२ जूनला ठेवली आहे.