श्री हंसरत्न विजयजी महाराजा यांचे ‘गुणरत्न संवत्सर तप’
By admin | Published: October 17, 2015 02:44 AM2015-10-17T02:44:21+5:302015-10-17T02:44:21+5:30
गेल्या अडीच हजार वर्षांत कोणत्याही साधू किंवा साध्वीजींना न जमलेली ‘गुणरत्न संवत्सर तप’ ही तपस्या श्री हंसरत्न विजयजी महाराजा यशस्वीरीत्या पूर्ण करण्याच्या मार्गावर आहेत
मुंबई : गेल्या अडीच हजार वर्षांत कोणत्याही साधू किंवा साध्वीजींना न जमलेली ‘गुणरत्न संवत्सर तप’ ही तपस्या श्री
हंसरत्न विजयजी महाराजा यशस्वीरीत्या पूर्ण करण्याच्या मार्गावर आहेत. येत्या १ नोव्हेंबरला हे तप पूर्ण होत असून त्याचा ‘पारणा’ महोत्सव त्याच दिवशी वांद्रे-कुर्ला संकुल मैदानात पार पडणार आहे. या विशेष कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेचे अनावरण शुक्रवारी षण्मुखानंद सभागृहात पार पडले.
शुक्रवारपासून सोळा दिवसांच्या उपवासाचे अखेरचे पर्व सुरू झाले आहे. त्यानिमित्ताने षण्मुखानंद सभागृहात नाशिकच्या संघवी परिवाराने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमात अनेक जैन
साधू आणि साध्वीजींसोबत हजारो श्रावक सामील झाले होते. ‘श्री
माटुंगा जैन श्वेतांबर मूर्तिपूजक तपागच संघ’ने कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडली. तपस्विनी चंपा यांनी कशाप्रकारे राजा अकबरलाही शाकाहाराचे महत्त्व पटवून दिले,
यावर आधारित एक नाटिका सादर करून कार्यक्रमाची शानदार सुरुवात केली. या वेळी रत्नसुंदर सुरीश्वरजी महाराजा यांनी श्रावकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, जगात तीन प्रकारची माणसे पाहायला मिळतात. एक म्हणजे जे कधीच इतिहास वाचत नाहीत. दुसरे इतिहास वाचून विसरतात, तर तिसऱ्या प्रकारात वाचलेला इतिहास त्यांच्या कायम स्मरणात असतो. मात्र हंसरत्न विजयजी महाराजांनी इतिहास वाचला, लक्षात ठेवला आणि आता ते आचरणात आणत आहेत. तसे करताना त्यांनी शरीरावर, मनावर आणि आत्म्यावर मिळवलेले नियंत्रण नक्कीच असाध्य आणि दुर्मीळ गोष्ट आहे. त्यामुळेच त्यांच्या जवळ येण्याने स्वर्ग मिळाल्याचा आभास होतो.
हजारोंच्या संख्येने उपस्थित राहिल्याने परिवर्तन होणार नसून त्यासाठी तप किंवा तपस्या अथवा एखाद्या गोष्टीचा त्याग करणे गरजेचे असल्याचे मतही रत्नसुंदर सुरीश्वरजी महाराजा यांनी व्यक्त केले. प्रत्येक व्यक्तीला तप किंवा तपस्या जमत नसली, तरी स्वेच्छेने एखाद्या वस्तूचे किंवा लाभ, क्रोध, मत्सर अशा स्वभावाचा त्यागही श्रावक करू शकतात, असेही त्यांनी सांगितले.
>> ‘गुणरत्न संवत्सर तप’ म्हणजे काय? : या तपामध्ये पहिल्या महिन्यात एक दिवसाआड, दुसऱ्या महिन्यात एक दिवसआड दोन दिवस उपवास केला जातो. जसे महिने वाढतील, तशी उपवासांची संख्याही वाढत जाते. सलग सोळा महिन्यांपर्यंत सुरू असलेल्या तपस्येत १६व्या महिन्यात सोळा दिवस उपवास आणि एक दिवस बियासणा म्हणजे साधे जेवण असते. म्हणजेच एकूण ४८० दिवस चालणाऱ्या तपस्येत ४०७ दिवस उपवास आणि ७३ दिवस बियासणा असते.
उपवास, बियासणा कठीण का?
तपस्या करणाऱ्या व्यक्तीला उपवासाच्या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी सहा वाजेदरम्यान केवळ गरम पाणी पिण्याची मुभा असते. तर सायंकाळी सहा ते सकाळी १० वाजेपर्यंत पाणीही पिता येत नाही. याउलट बियासणा म्हणजे साध्या जेवणात दूध, दही, तूप, साखर, फळे आणि पालेभाज्याही वर्ज्य कराव्या लागतात. शिवाय कोणताही प्रवास अनवाणी पायाने पायीच करावा लागतो. त्यासाठी प्रचंड इच्छाशक्तीसह शरीरावर, मनावर आणि आत्म्यावर नियंत्रण लागते.