Join us  

अध्यक्ष महोदय, हे चालू देणार नाही, ऊर्जामंत्र्यांच्या विधानावर फडणवीसांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 3:45 PM

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जाहीर केलं होतं की, मी शेतकऱ्यांच्या खात्यात 50-50 लाख रुपये देईल. पण, मोदींनी कुठं दिले? असा प्रश्न ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विधानसभेत उपस्थित केला.

ठळक मुद्देसन्माननीय नरेंद्र मोदींनी 2014 च्या निवडणुकींवेळी मोदींनी घोषणा केली होती. देशातून बाहेर गेलेला काळा पैसा मी परत आणेन आणि देशातील नागरिकांना 15-15 लाख रुपये देईन, असे म्हटले होते

मुंबई - हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सत्ताधारी आणि मंत्रीमहोदयांवर चांगलेच संतापल्याचे दिसून आले. सर्वप्रथम शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांच्यावर त्यांनी प्रहार केला. त्यानंतर, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलेल्या विधानावरुनही त्यांनी संताप व्यक्त केला. राज्यातील नागरिकांना 100 युनिट वीज मोफत देण्याची घोषणा ऊर्जामंत्री राऊत यांनी केली होती. मात्र, कोविडमुळे ते शक्य न झाल्याचं राऊत यांनी विधानसभेत सांगितलं.  

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जाहीर केलं होतं की, मी शेतकऱ्यांच्या खात्यात 50-50 लाख रुपये देईल. पण, मोदींनी कुठं दिले? असा प्रश्न ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्यावर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापले. हे चालू देणार नाही... हे चालणार नाही अध्यक्षमहोदय... देशाचे पंतप्रधान आहेत ते... त्यांनी कधीही अशी घोषणा केली नाही. ऊर्जामंत्र्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणीच फडणवीस यांनी केली. 

सन्माननीय नरेंद्र मोदींनी 2014 च्या निवडणुकींवेळी मोदींनी घोषणा केली होती. देशातून बाहेर गेलेला काळा पैसा मी परत आणेन आणि देशातील नागरिकांना 15-15 लाख रुपये देईन, असे म्हटले होते, हे जर खोटं असेल तर तपासून घ्यावेत, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विधानसभेत म्हटलं. त्यावर, फडणवीस यांनी हेही विधान खोटं असून मोदींनी कधीही तसं म्हटलं नसल्याचं सांगितलं. आही हे सहन करणार नाही, अशा शब्दात फडणवीस यांनी आपला संताप व्यक्त केला.  

भास्कर जाधवांनी माफी मागावी 

शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेच्या सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल करत त्यांच्यावर टीका केल्यानं विरोधी पक्ष भाजपा नेते आक्रमक झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नक्कल या सभागृहात केली जात असेल तर हे खपवून घेतले जाणार नाही. पंतप्रधान हे देशाचे आहेत. विधानसभेच्या सभागृहात अशाप्रकारे अंगविक्षिप्त करत असतील तर आम्ही अजिबात सहन करणार नाही. भास्कर जाधव यांनी माफी मागितली पाहिजे. अध्यक्षांनी भास्कर जाधव यांना समज द्यावी आम्ही माफी मागायला सांगावी, अशी मागणीच देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यावेळी सभागृहात भाजपा आमदारांनी प्रचंड गदारोळ केला.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसनितीन राऊतमुंबईविधानसभा