२६ नोव्हेंबरला विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृदगंध पुरस्कार’
By संजय घावरे | Published: October 30, 2023 05:27 PM2023-10-30T17:27:01+5:302023-10-30T17:28:18+5:30
१३ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह
मुंबई - पोवाडा, बहुरूपी, भारूड, भजन, गण-गवळण, लावणी, कवने, तुंबडी, बोबडी, धनगरी गीते, नंदीबैल, वासुदेव, डोंबारी, पोतराज, गोंधळी अशा अस्सल मराठमोळ्या लोककलेच्या सर्वच कलाप्रकारांत लीलया संचार केलेल्या लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या १३व्या स्मृतीदिनानिमित्त यंदाही 'मृद्गंध पुरस्कार' प्रदान करण्यात येणार आहे. यानिमित्त २६ नोव्हेंबर रोजी ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे.
सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना दरवर्षी ‘मृदगंध पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. पुरस्काराचे यंदाचे हे १३ वे वर्ष आहे. २०२३ च्या पुरस्कारांमध्ये जीवन गौरव, लोककला, सामाजिक, संगीत, अभिनय आणि नवोन्मेष प्रतिभा अशा विभागांमध्ये प्रतिष्ठित मान्यवर व्यक्तिंच्या हातून पुरस्कार प्रदान केले जातील. यावर्षीचे पुरस्कार विजेते कोण असतील? याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. त्याविषयीची घोषणा फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदेश विठ्ठल उमप लवकरच करणार आहेत. यापूर्वी पद्मश्री शाहीर साबळे (जीवन गौरव), ना. धों. महानोर, अशोक पत्की, सुलोचना चव्हाण, मंजिरी देव, जयंत पवार, पांडुरंग घोटकर, सुबोध भावे, राजाराम जामसांडेकर, विक्रम गोखले (जीवन गौरव ), पद्मश्री डॉ. अभय बंग, डॉ. नागनाथ कोधापल्ले, डॉ. निलेश साबळे, शकुंतला नगरकर, अमित राज, मधुमंगेश कर्णिक (जीवन गौरव), वसंत अवसरीकर, ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर, अच्युत ठाकूर, ज्योती म्हापसेकर, हरेंद्र जाधव, प्रेमानंद गज्वी, प्रशांत दामले, अशॊक वायंगणकर, प्राजक्ता कोळी, रवींद्र भिलारी, माया जाधव (जीवन गौरव), जयंत सावरकर (जीवन गौरव), डॉ. विजया वाड, उत्तर केळकर, ओम राऊत, सत्यपाल महाराज, राजेश टोपे, फ. मु . शिंदे (जीवन गौरव), पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे आणि पद्मश्री पद्मा कोल्हे, संजय मोने, सुकन्या मोने, रवींद्र साठे, कमलबाई शिंदे, श्रेया बुगडे हे मृदगंध पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. संगीत समारोहमध्ये पद्मश्री पं. सुरेश वाडकर, पद्मश्री उस्ताद राशीद खान, राहुल देशपांडे, महेश काळे, पद्मश्री पद्मजा फेणाणी, आरती अंकलीकर टिकेकर, शौनक अभिषेकी, शिवमणी, गणेश चंदनशिवे, लावणी साम्राज्ञी शकुंतला नगरकर, आदिती भागवत, सोनिया परचुरे, पं. रोनू मुजुमदार, तौफिक कुरेशी आदि कलावंतांनी सादरीकरण केले आहे.