लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई - शाहिर विठ्ठल उमप यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा 'मृदगंध' जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना घोषित करण्यात आला आहे. विठ्ठल उमप फाऊंडेशनचे अध्यक्ष तसेच गायक नंदेश उमप यांनी एका पत्रकार परिषदेत जीवनगौरव पुरस्कारासोबतच इतर सहा मृदगंध पुरस्कारांची घोषणा केली.
सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्तींना विठ्ठल उमप फाऊंडेशन तर्फे 'मृदगंध पुरस्कार' देण्यात येतो. प्रभावळकरांसोबत सुदेश भोसले यांना संगीत विभागातील, आतांबर शिरढोणकर यांना लोकसंगीतातील, अनुराधा भोसले यांना सामाजिक कार्यातील, सुमित राघवन यांना अभिनय क्षेत्रातील, चिन्मयी सुमित यांना अभिनय क्षेत्रातील, केतकी माटेगावकरला नवोन्मेष मृदगंध पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे.
१३ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व विठ्ठल उमप फाऊंडेशनचा 'मृदगंध पुरस्कार' वितरणाचा सोहळा यंदा २६ नोव्हेंबरला ठाणे येथील काशिनाथ घाणेकर सभागृहात सायंकाळी ६ वा होणार आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असून, उपसभापती नीलम गोऱ्हे, उद्योग मंत्री उदय सामंत, मुंबई भाजपाचे अध्यक्ष अॅड आशिष शेलार, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाण्याचे आयुक्त अभिजीत बांगर, ठाण्याचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आदी मंडळीही हजर राहणार आहेत. डॉ.सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांचा 'आयुष्यावर बोलू काही' हा कवितांचा विशेष कार्यक्रम या सोहळ्यात होणार असून, शाहीर बापू जाधव यांच्या लोककला शाहिरीचा तसेच खुशाबा यांच्या आदिवासी नृत्याचा आस्वादही रसिकांना घेता येईल.
नंदेश म्हणाले की, बाबांचे काम समाजापर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्या कामातून नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात. लोककला, प्रबोधन आणि चळवळीचा बाबांनी पसरवलेला मृदगंधी पुढे पोहोचवण्याचे काम आम्ही करत आहोत. विठ्ठल उमप अॅम्फीथिएटर सुरू करण्यासाठी सरकारकडे बऱ्याच वर्षांपासून पाठपुरावा करत आहे, पण अद्याप यश आलेले नाही. बाबांना पद्म पुरस्कार मिळाला नसल्याची खंतही नंदेशने व्यक्त केली.