गोरेगावातील उड्डाणपुलाला अखेर मृणाल गोरे यांचे नाव
By admin | Published: March 19, 2016 01:23 AM2016-03-19T01:23:44+5:302016-03-19T01:23:44+5:30
गोरेगावच्या निरलॉन ते राममंदिर रोड या गोरेगावच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या नव्या उड्डाणपुलाला अखेर मृणाल गोरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेच्या
मनोहर कुंभेजकर, मुंबई
गोरेगावच्या निरलॉन ते राममंदिर रोड या गोरेगावच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या नव्या उड्डाणपुलाला अखेर मृणाल गोरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज मंजूर झाला. या पुलाला मृणाल गोरे यांचे नाव देण्याची शिवसेनेची मागणी होती तर राज्याच्या महिला व बालकल्याण राज्यमंत्री आणि गोरेगावच्या भाजपाच्या आमदार विद्या ठाकूर यांची या पुलाला सावित्रीबाई फुले उड्डाणपूल असे नाव देण्याची मागणी यापूर्वी पालिका आयुक्त अजय मेहता यांच्याकडे केली होती. या उड्डाणपुलाच्या नामांतरावरून रंगलेला कलगीतुरा ‘लोकमत’ने प्रभावीपणे मांडला होता.
गोरेगावचे रहिवासी असलेले आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मृणाल गोरे यांचे नाव देण्यासाठी पालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अभियांत्रिकीचा उत्तम नमुना असलेला आणि आधुनिक तंत्रज्ञानाने बांधलेला हा उड्डाणपूल पालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा आहे. येत्या ३० मार्च रोजी वाहतुकीसाठी खुल्या होण्याची शक्यता आहे.
या उड्डाणपुलाला मृणालताई गोरे यांचे नाव देण्यासाठी शिवसेनेचे आमदार, विभागप्रमुख व माजी महापौर सुनील प्रभू सुरुवातीपासूनच आक्रमक झाले होते. प्रभू हे दिंडोशीचे आमदार असले तरी गोरेगाव (पूर्वे) कडील जाणारा हा उड्डाणपूल ते नगरसेवकपद भूषवत असलेल्या प्रभाग क्र. ४८मधून हा पूल जातो. त्यामुळे या उड्डाणपुलाला मृणालताई गोरे यांचे नाव देण्याची मागणी त्यांनी स्थापत्य समिती अध्यक्ष (उपनगरे) दीपक भूतकर यांच्याकडे गेल्या सप्टेंबरलाच केली होती. कै. मृणाल गोरे यांनी आपल्या राजकीय व सामाजिक कार्याचा अमिट ठसा उमटवला होता. सामान्य माणसांच्या भावना आणि वेदना त्या वेळच्या राजकीय परिस्थितीनुसार त्यांनी मांडून सामान्य माणसांना न्याय मिळवून दिला. सामाजिक राजकीय चळवळीतील अग्रगण्य नेत्या, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेतेपद, खासदार आणि जनमानसात लोकप्रिय असलेल्या मृणालतार्इंच्या विविध क्षेत्रांतील योगदानाची स्मृती चिरंतन राहावी, म्हणून या उड्डाणपुलास त्यांचे नाव देण्यात अशी समस्त गोरेगावकर नागरिकांचीही इच्छा होती.
पालिकेच्या गेल्या आठवड्यात झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत आ. सुनील प्रभू यांच्या ठरावाला स्थायी समिती अध्यक्ष यशोधर (शैलेश) फणसे यांनी अनुमोदन दिले होते आणि गटनेत्यांच्या सभेत हा ठराव मंजूर झाला होता. या उड्डाणपुलाला मृणालताई यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी पी (दक्षिण) विभागाच्या प्रभाग समिती अध्यक्षा प्रमिला शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गोरेगावातील महिलावर्गाने घरोघरी जाऊन सह्यांची मोहीम आखली होती. गोरेगाव पश्चिम आणि पूर्व भागातून या पुलाला मृणाल गोरे यांचे नाव देण्याच्या शिवसेनेच्या मागणीसाठी सुमारे सहा हजारांहून अधिक गोरेगावकरांनी पसंती दिली. तर सोशल मीडियावरदेखील हजारो गोरेगावकरांनी मृणाल गोरे यांच्या नावाला पसंती दिल्याची माहिती माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांनी दिली.