महामार्गावरील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावणार ‘मृत्युंजय दूत’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:07 AM2021-02-27T04:07:04+5:302021-02-27T04:07:04+5:30
१ मार्चपासून कार्यरत; राज्यभर अभिनव उपक्रम जमीर काझी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील महामार्गावर होणाऱ्या अपघातातील मृत्यूंचे प्रमाण ...
१ मार्चपासून कार्यरत; राज्यभर अभिनव उपक्रम
जमीर काझी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील महामार्गावर होणाऱ्या अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी आता ‘हायवे मृत्युंजय दूत’ प्रयत्न करणार आहेत. अर्थात ते अन्य दुसरे, तिसरे काेणी नसून आपल्या सभोवतालची होतकरू माणसे असतील.
महामार्गाच्या परिसरात गावातील नागरिक, तेथील हॉटेल, धाबे, मॉल्स, पेट्रोलपंपावरील कर्मचारी ही भूमिका बजविणार आहेत. महामार्ग वाहतूक विभागाचे प्रमुख अप्पर महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. येत्या १ मार्चपासून तो कार्यान्वित केला जाईल.
देशात दरवर्षी रस्ते अपघातात सरासरी दीड लाख नागरिक जीव गमावतात. राज्यात त्याचे प्रमाण सरासरी साडेअकरा हजारांहून अधिक आहे. महाराष्ट्रात गेल्या चार वर्षांत अपघातांमध्ये ५०,१२९ जणांचा बळी गेला. त्यामध्ये अनेकांना वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने जिवाला मुकावे लागले. ही परिस्थिती बदलण्यासाठी ‘हायवे मृत्युंजय दूत’ ही योजना राबविली जात आहे.
महामार्गाच्या परिसरात प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी चार, पाच नागरिकांचा गट बनवून त्यांना ओळखपत्र दिले जाईल. अपघातग्रस्तांना मदत केल्यास पोलिसांचा ससेमिरा त्यांच्या मागे लागणार नाही, हे पटवून देऊन परिसरात एखादी दुर्घटना घडल्यास अपघातग्रस्तांना कसे हाताळावे, तातडीने प्रथोमपचार कसे करावे, याबाबत स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने दोन तासांचे शास्रोक्त प्रशिक्षक दिले जाईल, त्यांना एक स्ट्रेचर व ‘फर्स्ट एड’चे साहित्य पुरविले जाईल. त्यांना महामार्गावर १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका तसेच हॉस्पिटलची माहिती, त्यांचे नंबर उपलब्ध करून दिले जातील, जेणेकरून त्यांना जखमींना त्याठिकाणी ‘गोल्डन अवर’मध्ये पोहचविता येईल. दुर्घटनेच्या ठिकाणी त्वरित पोहचून मदतकार्य, चांगले काम करणाऱ्या या दूतांना संबंधित महामार्ग सुरक्षा अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र दिले जाईल. तसेच संबंधितांची माहिती राष्ट्रीय पुरस्कारासाठी पाठविली जाईल. या योजनेंतर्गत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा अहवाल अधिकाऱ्यांना प्रत्येक पंधरवड्याला ट्रॅफिक चौकीवरून मुख्यालयाला पाठवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
(समाप्त)
-----------------------
अपघाताची घटना घडल्यानंतर त्याठिकाणी पोलीस पोहोचेपर्यंत जखमींना स्थानिकांकडून तातडीने मदत मिळावी, यासाठी ‘हायवे मृत्युंजय दूत’ संकल्पना राबवित आहोत. जेणेकरून मृत्यूचे प्रमाण कमी होईल, त्यासाठी त्यांना आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार आहे.
- डॉ. भूषणकुमार उपाध्याय (अप्पर महासंचालक, राज्य महामार्ग वाहतूक विभाग)