Join us

अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर एमआरटीपीअंतर्गत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 5:17 AM

पोलिसांत करणार तक्रार; पालिका आयुक्तांचे आदेश

मुंबई : डोंगरी येथील इमारत दुर्घटनेतून मुंबईत मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांचा धोका समोर आला. मात्र पालिकेने नोटीस दिल्यानंतरही पुन्हा पुन्हा अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अशांवर आता मुंबई प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ (एमआरटीपी) अन्वये थेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येणार आहे.मोकळ्या जागांवर होणारे अतिक्रमण मुंबईपुढे मोठे आव्हान ठरू लागले आहे. अनधिकृत बांधकामांमुळे जीवितहानीचा धोकाही वाढत असल्याचे गेल्या काही दुर्घटनांवरून दिसून आले आहे. अतिक्रमणधारकांना ‘मुंबई प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६’ अन्वये नोटीसही दिली जाते. मात्र, या कारवाईनंतरही त्याच जागी पुन्हा पुन्हा अनधिकृत बांधकाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे.याची गंभीर दखल मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी घेतली आहे. अनधिकृत बांधकामांप्रकरणी महापालिकेला अनेक वेळा न्यायालयाच्या टीकेला सामोरे जावे लागत असते. त्यामुळे एमआरटीपीअंतर्गत कारवाई करून पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात तक्रार करण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाºयांना दिले आहेत. प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी पोलीस आयुक्तांबरोबर चर्चा करणार असल्याचेही पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता यापुढे अनधिकृत बांधकाम करणाºयांना एमआरटीपीअंतर्गत कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.