महिला प्रवाशांसाठी एमआरव्हीसीचा सर्व्हे
By admin | Published: September 25, 2015 03:18 AM2015-09-25T03:18:11+5:302015-09-25T03:18:11+5:30
महिला प्रवाशांची वाढत जाणारी संख्या आणि सध्या त्यांना मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधा पाहता एमआरव्हीसीने (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) रेल्वे स्थानकांवर सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला आहे
मुंबई : महिला प्रवाशांची वाढत जाणारी संख्या आणि सध्या त्यांना मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधा पाहता एमआरव्हीसीने (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) रेल्वे स्थानकांवर सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व्हेला सुरुवात झाली असून त्यामुळे महिला प्रवाशांच्या समस्या सोडवण्यावर भर दिला जाणार असल्याचे एमआरव्हीसीकडून सांगण्यात आले.
मध्य रेल्वेची मेन लाईन आणि हार्बरवर तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर जवळपास ८0 लाख प्रवासी प्रवास करतात. यात मोठ्या प्रमाणात महिला प्रवासीही असून त्याची नोंद रेल्वेकडे आढळत नाही. मात्र महिला प्रवाशांची प्रवासातील संख्या लक्षणीय असल्याचे सांगितले जाते. सध्या महिला प्रवाशांना प्रसाधनगृह आणि सुरक्षेसह काही समस्या सतावत आहेत.
याबाबत महिला प्रवाशांकडून रेल्वेकडे तक्रार करुनही त्यावर कठोर कारवाई होताना दिसत नाही. हे पाहता एमआरव्हीसीने रेल्वेच्या तीन्ही मार्गावर महिला आणि पुरुष प्रवाशांची संख्या शोधणारा सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांना सतावणाऱ्या समस्या कोणत्या याची माहीतीही या सर्व्हेक्षणातून घेतली जाणार असून टीसकडून (टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स) हा सर्व्हे केला जात असल्याची माहीती एमआरव्हीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांनी दिली. या सर्व्हेला एक महिन्यांपूर्वी सुरुवात करण्यात आली असून त्याचा काही दिवसांतच अहवाल सादर होईल. या अहवालानंतर महिला प्रवाशांच्या समस्या नेमक्या कोणत्या आणि त्या सोडवण्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे यावर काम केले जाईल, असेही ते म्हणाले.